मुले, वृद्ध, दिव्यांग व कुष्ठरोग्यांनी अनुभवला दिवाळीचा अानंद

अमित गवळे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

देवामृत फाउंडेशनच्या वतीने शांतीवन वृध्दाश्रम व कल्याण आश्रमात मिठाई व फराळाचे वाटप

पाली : देवामृत फाउंडेशनच्या वतीने दिवाळीत पनवेल येथील शांतीवन व कर्जत येथील कल्याण आश्रमात दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. मराठा सुराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रणय सावंत यांनी आपल्या आई वडीलांच्या पाचव्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून वृध्दाश्रमातील वयोवृध्द दाम्पत्ये तसेच आश्रमातील मुलांना दिवाळी फराळ व मिठाई वाटप करुन दिवाळी साजरी केली.

देवामृत फाउंडेशन महाराष्ट्रभरात विवीध सामाजिक,शैक्षणिक, व सेवाभावी उपक्रम राबविते. मिरा लाड व लाड दांम्पत्यांचा पनवेल येथे शांतीवन आश्रम आहे. या आश्रमात वृध्दांसह कृष्ठरोगी, मानसीक व शारीरीक विकलांगाची सेवा केली जाते. कर्जत येथे ठमा पवार यांचा कल्याण आश्रम आहे. या आश्रमात संस्कारकेंद्र,आरोग्यसेवा केंद्र आणि खेळाडुंना मार्गदर्शन केले जाते.यावेळी प्रणय सावंत यांनी समाजसेविका मिरा लाड व ठमा पवार यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की वृध्दाश्रम सुरु करणे व ते यशस्विरित्या चालविणे यात मोठा फरक आहे. समाजकार्य करीत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 

वेळ प्रसंगी अपमान व अवहेलनादेखील सहन करावी लागते. यावर मात करुन या दोन महिला समाजसेविका आपले कार्य जिकरीने व धैर्याने पुढे नेत आहेत. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे या महिला समाजसेविकांनी आपल्या कार्यातून सिध्द केले आहे. नेहमी दुसर्‍यांबद्दल आदर व तळमळ असणे, त्यासाठी वेगवेगळ्या विचारांच्या प्रवाहात चालणे, चाकोरीबाहेरील वाट चोखाळणे, निर्धाराने पुढे जाणे हे या कर्तृत्ववान महिलांकडून शिकण्यासारखे अाहे. यावेळी देवामृत फाउंडेशनचे मार्गदर्शक प्रणय सावंत, फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया जाधव, उद्योजक निलेश चौधरी, सविता चव्हाण, शितल देसाई, स्वाती चौधरी, अनिल शिंदे, स्नेहा शिंदे, वर्षा चौधरी आदिंसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थीत होते.