अवलिया तरुणाचा पायी चालण्याचा ध्यास...

अमित गवळे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

चालणे हेच मला हीरो बनविते. चालण्याचा सर्वाधिक कंटाळा असलेलो मी चालण्याचे महत्व व फायदे ओळखून चालण्याचा ध्यास घेतला. पायी चाला आणि आरोग्य राखा हा संदेश सगळ्यांना देत आहे. या मोहिमेत अनेक माणसे जोडली गेली. खुप सकारात्मक अनुभव मिळाले. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले. यापुढेही पायी चालण्याचा संकल्प सदैव कायम ठेवणार आहे.
- प्राजित परदेशी, पायी चालण्याच्या संकल्प केलेला तरुण.

अवघ्या दोन महिन्यात पायी चालण्याचा दोन वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड

पाली (रायगड) : धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात कित्येक जण चालने विसरून गेले आहेत. चालल्याने आपले आरोग्य निरोगी व सदृढ राहते. अधिकाधिक लोकांनी चालावे यासाठी एक अवलिया तरुण शेकडो मैल चालत आहे. तब्बल 104 तास चालून त्याने 470 किमी अंतर पार करून अष्टविनायक दर्शन पूर्ण केले. गुरुवारी (ता.31) त्याने पालीतील बल्लाळेश्वराचे दर्शन घेवून आपल्या पायी यात्रेची सांगता केली.

सांगली जिल्ह्यातील लोणंद येथे राहणाऱ्या प्राजित परदेशी (वय 30) या तरुणाची दोन महिन्यात चालण्यासाठी चक्क दोनदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. प्राजित हे व्यवसायिक आहेत. तसेच भाजपचे सातारा जिल्हा ओबीसी सेलचे सरचिटणीस आहेत. अष्टविनायक पायी यात्रेसाठी प्राजित यांनी शनिवारी (ता. 26) मोरगाव येथून सुरुवात केली. या वेळी लिम्का बुक ऑफ रेकोर्डच्या अधिकाऱ्यांनी येवून परीक्षण केले. गुरुवारी (ता. 31) ते पालीचा आठवा गणपती बल्लाळेश्वराच्या दारी पोहचले. अशा प्रकारे 104 तासात त्यांनी 470 किमी अंतर पायी चालून पार केले. आणि याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. या आधी त्यांनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पची 140 किमी चढाई केली आहे. तर नुकतेच अवघ्या 58 तासांत 245 किमी अंतर चालून आळंदी ते पंढरपुर वारी केली आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद देखील लिम्का बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे. अवघ्या आठ महिन्यात प्राजित यांनी तीन पायी चालण्याच्या मोहिमा फत्ते केल्या असून, जवळपास आठशे किमी पेक्षा अधिक अंतर पायी चालले आहेत.

प्राजित यांनी 'सकाळ' सोबत बोलताना सांगितले की, 'या अष्टविनायक पायी मोहिमेत त्यांना अनेक नागरिकांनी सहकार्य केले. वाटेत अनेक ठिकाणी सत्कार झाले. भेटलेल्या प्रत्येकाला चालन्याचे महत्व सांगितले आणि चालण्याची ग्वाही घेतली. त्यांच्या सोबत असलेले मित्र आदित्य कांबळे, अजय चिखले, सागर गायकवाड, दत्तात्रेय भोइटे आणि आकाश शेळके यांनी साथ दिली आणि मदत केली. वाटेत पाणी जेवण देणे, पायाला स्प्रे मारणे, पाय चेपण्या पासून सर्व कामे केली.'

प्राजित रोज दहा ते पंधरा किलोमीटर चालण्याच्या सराव करतात. अष्टविनायक पायी मोहीम फत्ते करतांना चालून त्याच्या पायाचे तळवे पूर्णपणे सोलेले आहेत. पायला फोड आले आहेत. तसेच पाण्यामुळे पाय कुंजले आहेत. अष्टविनायक पायी मोहीम फत्ते केल्यावर त्यांच्या अंगात त्राण उरला नव्हता, परंतु चालण्याचा आत्मविश्वास आणि उत्साह मात्र दांडगा होता. प्राजित यांची यापुढची मोहीम एव्हरेस्ट सर करण्याची असल्याचे त्यांनी सकाळला सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर