पालीजवळील आंबा नदीच्या पुलावरून पाणी, वाहतूक धिम्या गतीने

अमित गवळे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पाली वाकण मार्ग हा थेट मुंबई गोवा महामार्ग आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गाला जोडतो.

पाली : मुसळधार पावसामुळे येथील पाली वाकण दरम्यान असलेल्या आंबा नदीच्या मुख्य पुलावरुन मंगळवारी (ता.29) संध्याकाळी पाणी गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास रात्री ही वाहतूक बंद होण्याची शक्यता होती. त्यामुळे कोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या गणेश भक्तांची गैरसोय झाली होती.

पुलावरुन पाणी जावु लागताच पाली पोलीस व महसुल कर्मचाऱ्यांनी खबरदारी दिली होती. कोणताही अपघात होऊ नये व वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त होता. सुधागड तहसीलदार बि. एन. निंबाळकर यांच्यासह पोलीस अधिकारी व महसुल कर्मचारी उपस्थित होते.

पाली वाकण मार्ग हा थेट मुंबई गोवा महामार्ग आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गाला जोडतो. त्यामुळे अनेक प्रवाशी या सोयीच्या मार्गाचा वापर करतात. मात्र पुलावरुन पाणी गेल्याने प्रवाश्यांची गैरसोय झाली होती.