देवीच्या दारात अंधश्रद्धाचे निर्मूलन; अंनिसचे चमत्कार

अमित गवळे
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

चमत्काराच्या प्रयोगांचे सादरिकरण सुधागड-पाली महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांनी केले. यामध्ये पाण्याचा दिवा पेटविणे, हवेतून अंगठी काढणे, नारळातुन हळद कुंकू व काळी पट्टी काढणे, हातातून चैन काढणे, जिभेत तार टाकणे, जळता कापुर जिभेवर धरणे, बदललेल्या तसेच मनातील वस्तु ओळखणे, गंगेची प्रार्थना, स्पर्श भ्रम करणे आदी प्रयोग दाखविले. अमित निंबाळकर यांनी या प्रयोगांचे शास्त्रीय कारण स्पष्ट केले. आणि त्या मागील तंत्र देखील उपस्थितांना शिकविले.

पाली : येथील मरिमाता नवतरुंण मित्रमंडळ उंबरवाडी-बेगरआळीतर्फे नवरात्रोत्सवात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले गेले. बुधवारी (ता.27) पाली-सुधागड महाराष्ट्र अंनिसच्या वतीने चमत्काराचे सादरिकरणाचे प्रयोग करण्यात आले. या माध्यमातून बुवाबाबा आणि जादूटोण्या संदर्भात जागृती करण्यात आली. तसेच मंडळातर्फे रोज मुलांसाठी बुद्धिबळ, कॅरम आणि प्रश्नमंजुषा आदि स्पर्धा घेतल्या जात आहेत.

चमत्काराच्या प्रयोगांचे सादरिकरण सुधागड-पाली महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांनी केले. यामध्ये पाण्याचा दिवा पेटविणे, हवेतून अंगठी काढणे, नारळातुन हळद कुंकू व काळी पट्टी काढणे, हातातून चैन काढणे, जिभेत तार टाकणे, जळता कापुर जिभेवर धरणे, बदललेल्या तसेच मनातील वस्तु ओळखणे, गंगेची प्रार्थना, स्पर्श भ्रम करणे आदी प्रयोग दाखविले. अमित निंबाळकर यांनी या प्रयोगांचे शास्त्रीय कारण स्पष्ट केले. आणि त्या मागील तंत्र देखील उपस्थितांना शिकविले. असे चमत्कार दाखविणाऱ्या भोंदू बुवा-बाबांच्या फसवणुकीला बळी पडू नका.

प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा जाणून घेवून विवेक बुद्धिने विचार करूनच एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवा. करणी भानामती हे सर्व थोतांड आहेत. त्यामुळे कुठल्याही अंधश्रद्धेच्या आहारी जावु नका असे आवाहन निंबाळकर यांनी केले. चमत्कारांचे सादरिकरणासाठी केतन निंबाळकर या कार्यकर्त्यांनी सहाय्य केले. आदल्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात निंबाळकर यांनी "वेड लागले" हे भारुड सादर करून अंधश्रद्धेवर घाला घातला. यावेळी त्यांना मंडळाचे अध्यक्ष दिपक शिंदे आणि आकाश दळवी यांनी साथ दिली. गुरुवारी (ता.28) येथे सर्प प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. असे विविध प्रबोधनात्मक आणि जनजागृती करणारे उपक्रम मंडळाकडून राबविले जात आहेत.

मुलांना मोबाईल व टीव्ही पासून दूर ठेवण्यासाठी बुद्धिला चालना देणारे खेळ, विविध स्पर्धा आणि उपक्रम, मुलांना मोबाईल व टीव्ही ऐवजी विधायक कामात गुंतवून ठेवण्यासाठी येथील विजय साईलकर आणि गावित सर यांनी मुलांसाठी बुद्धिला चालना देणारे खेळ व उपक्रम राबविले. त्यामध्ये बुद्धिबळ, कॅरम, प्रश्नमंजुषा आदि खेळ व स्पर्धांचे आयोजन केले. मुलांनी देखील मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. मंडळातर्फे संपूर्ण नऊ दिवस असे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जात आहेत.