संततधारेने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

"यावर्षी तुलनेत भातपीक चांगले तरारले होते; पण धुवॉंधार पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.‘‘ 
- सुधीर वाळिंबे, शेतकरी-नाखरे 

रत्नागिरी- गेले तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज गडगडाटासह दिवसभर संततधार धरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येण्याची वेळ आली आहे. भातपीक आडवे पडूनही काहीच करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आश्‍विन महिन्यात आषाढ सरी कोसळत असल्याचा अनुभव सध्या जिल्हावासीय घेत आहेत. 

अनंत चतुर्दशीला सुरू झालेला पाऊस आठ दिवस कोसळत होता. गेले चार दिवस पावसाने विश्रांती घेतली आणि कडक ऊन पडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीस सुरवात केली; परंतु पावसामुळे भात ओले असल्याने ते शेतातच वाळत टाकण्यात आले होते; परंतु गेले दोन दिवस पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापलेले भात पुन्हा भिजले.

भात वाळण्यासाठी आणखी आठ दिवस लागणार असल्याने त्याला पुन्हा कोंब येण्याची शक्‍यता आहे. महान भात कापणीला अद्याप अवधी आहे; मात्र हळवे भात तयार झाले असले, तरी पावसाने ते कापण्यासाठी अवघ्या तीन दिवसांची उसंत दिली होती. घट बसल्यापासून दोन ते तीन दिवस वगळता सातत्याने पाऊस पडतच आहे. आज दक्षिण रत्नागिरीमधील चार तालुक्‍यांत सूर्यदर्शनही झाले नाही. 

जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्‍यात जोरदार पाऊस पडला. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण तालुक्‍यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. चिपळूणमध्ये दुपारपर्यंत पाऊस कोसळत होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत पाऊस पडल्यास शेतकऱ्याची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. पावसामुळे जिल्ह्यात पावसामुळे कोठेही नुकसानीची नोंद नाही. राजापूर तालुक्‍यातील अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. 

दिवाळीवर पावसाचे सावट 
पावसाचा जोर असल्याने बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी दसरा आणि दिवाळीचा माल आणून ठेवला आहे; परंतु सध्या पावसाने आणि भात कापायला झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. रत्नागिरीत नवरात्रीत दररोज सुमारे दहा ते बारा टन गोंडा येत आहे. काही व्यापाऱ्यांनी 15 टनापर्यंत फुले मागवली होती; मात्र पावसाने साराच गोंधळ घातला. आज फुलांची विक्रीही कमी झाली आणि व्यापाऱ्यांनी फुले बाहेर काढली नाहीत. बाजारातील व्यवसाय पावसामुळे निम्म्यावर आला असल्याची माहिती येथील व्यापारी मोरे यांनी दिली. 

Web Title: Rain returns in Kokan; puts Farmers in worry