कर्जतवर यंदा राजनाला कृपा

राजनाला कालव्यातून वाहणारे पाणी.
राजनाला कालव्यातून वाहणारे पाणी.

नेरळ - राजनाला कालव्याच्या दुरुस्तीची कामे अनेक अडचणींवर मात करीत पूर्ण करण्यात पाटबंधारे खात्याला यश आले आहे. पाच वर्षांपासून सुरू झालेल्या दुरुस्तीमधील काही कामे अपूर्ण असली तरी शुक्रवारपासून (ता. 16) शेतीला पाणी सोडण्यात आले आहे; मात्र कालव्यांच्या साफसफाईअभावी किती शेतीपर्यंत हे पाणी पोहोचेल, अशी शंका शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

कर्जत तालुक्‍याचा पूर्व भाग 40 वर्षे हिरवागार ठेवणाऱ्या राजनाला कालव्याची दुरुस्ती पाच वर्षांपासून सुरू असल्याने या परिसरातील दुबार शेती बंद झाली होती. 45 गावांतील 2500 हेक्‍टरहून अधिक जमीन या कालव्यामुळे ओलिताखाली आली.

अनेक वर्षे मुख्य, डावा आणि उजवा कालवा यांची दुरुस्ती करण्यात न आल्याने निम्म्या पाण्याची गळती होत होती. शेतापर्यंत नीट पाणी पोहोचत नसल्याने शेतकरीही कंटाळले होते. स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी अनेक वर्षे सरकारदरबारी प्रयत्न केल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री व पालकमंत्री सुनील तटकरे यांनी निधीची तरतूद केली. या वर्षी बहुतांश कामे पूर्ण झाल्याने कालव्याचे पाणी सर्व भागांत पोहोचेल, असा कर्जत पाटबंधारे खात्याचा दावा आहे.

पोटल पाली कालव्याचे अनेक वर्षे रखडलेले काम पूर्ण होत आले आहे. तेथे वन विभागाने आपली जमीन असल्याचा दावा केला होता. 1959 मध्ये ही जमीन पाटबंधारे खात्याकडे आल्याचे पटवून देण्यात या खात्याला यश आल्याने तेथील दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत. डिसेंबरमध्ये दुबार शेतीसाठी या कालवा परिसरात पाणी दिले जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाने यापूर्वीच जाहीर केले आहे, अशी माहिती राजनाला कालव्याची जबाबदारी असलेले विभागीय अभियंता बी. बी. काटके यांनी दिली. पाणी सोडू नये, अशी हरकत या वर्षी कोणाही शेतकऱ्याने नोंदवलेली नाही.

तयारी व अडचणी
- मुख्य कालव्याच्या झिरो पॉईंटवरून सर्व कालव्यांत पाणी सोडण्याची तयारी.
- डावा, उजवा आणि पोटल पाली कालव्यात वाहून आलेले दगड, माती; तसेच झाडे, झुडपे आजही कायम.
- पाणी सोडण्याआधी कालव्यांची साफसफाई करण्याची शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी.

राजनाला कालव्यात पाणी सोडण्याआधी पाटबंधारे विभागाने कालव्यात साचलेला गाळ, कचरा आणि दगड बाहेर काढावेत. पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य कालव्यात पाणी सोडल्यानंतर पोटकालव्यात पाणी व्यवस्थित जात आहे किंवा नाही, याची खात्री करण्याची गरज आहे. पाणी पुढे पळत राहिले नाही तर ते कालव्यात एका ठिकाणी थांबून तेथे कालवे किंवा पोटकालवे फुटून आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होण्याची भीती आहे.
- नाना गांगल, प्रगत शेतकरी, जांभिवली.

जाहीर झालेल्या तारखेला राजनाला कालव्याचे पाणी सोडल्यानंतर पुढील आठवडाभरात ते सर्व दोन हजार 542 हेक्‍टर जमिनीत पोहोचेल, अशी पाटबंधारे विभागाला खात्री आहे. काही किरकोळ कामे बाकी आहेत, ती या हंगामात पूर्ण केली जातील. कालव्याचे पाणी पूर्वी ज्याप्रमाणे पोहोचत होते त्याप्रमाणे शेवटच्या शेतापर्यंत पोहोचेल, अशी खात्री आहे.
- बी. सी. दाभिरे,उपअभियंयता, पाटबंधारे विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com