भातशेतीवर किडीने बळीराजा चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

राजापूर - भातलावणीच्या वेळी दडी मारलेला पाऊस गेल्या आठवड्यात तीन दिवस चांगला कोसळला. त्यानंतर पडणाऱ्या हलक्‍या सरींमुळे भातशेतीला फायदा झाला आहे; मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांना सध्या नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भातशेतावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

शेतीच्या हंगामाच्या सुरवातीला दमदारपणे आगमन करणाऱ्या पावसाने भातलावणीच्या कामांच्या ऐन हंगामामध्ये दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याआधारे डिझेल पंप आदींच्या साह्याने पाणी उपलब्ध करीत लावणी उरकली. लावणी झालेल्या रोपांची योग्य वाढ होण्यासाठी पाण्याची आवश्‍यकता होती. तेव्हा पावसाने मेहेरबानी केली. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या दिवसभरामध्ये हलक्‍या सरी पडतात. त्यामुळे लावणी झालेल्या भातशेतीसाठी आधार झाला आहे. तालुक्‍यात काही ठिकाणी किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याच्या आनंदावर काहीसे विरजणही पडले आहे. 

विशेष करून नद्यांच्या काठावरील गावांमधील भातशेतीवर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.  अनेक शेतांच्या मळ्यांमधील भाताची रोपे किडींनी खाऊन फस्त केली आहेत. त्यातून शेतकऱ्यांना नव्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी फवारण्या करीत आहेत; मात्र त्यामध्ये फारसे यश येत नाही. औषध फवारणीनंतरही कीड आटोक्‍यात न आल्याने नेमके काय करायचे असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.