राजापूर टंचाईमुक्त दाखवण्याचा प्रयत्न?

राजापूर टंचाईमुक्त दाखवण्याचा प्रयत्न?

राजापूर - जिल्हाभरात टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर धावत आहेत. मात्र, राजापुरात सारे आलबेल आहे. तालुक्‍यात पाणीटंचाई नाही, असे चित्र कागदावर रंगवले आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. २१ गावातील २९ वाड्यांमधील लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. खासगी टॅंकर धावत आहेत. प्रशासनाकडे टॅंकर उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. यामुळे टंचाईग्रस्त टॅंकर देता का टॅंकर, असा टाहो फोडत आहेत. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुक्‍याला पाणीटंचाईच्या झळा पोहचल्या आहेत. तालुक्‍यातील २१ गावे आणि २९ वाड्यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे गेल्या दोन महिन्यांपासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. त्यामध्ये केळवली प्राथमिक आरोग्य केंद्र, ताम्हाणे धनगरवाडी, धाऊलवल्ली गयाळकोकरी, तरबंदर, मोरोशी गावकरवाडी, मिरासवाडी, तळेवाडी, नारकर सुतारवाडी, गोसवेवाडी, जुवाठी पुजारेवाडी, शिळ बौध्दवाडी, कणेरी वरचीवाडी, झर्ये धनगरवाडी, पेंडखळे धनगरवाडी, महाळुंगे विखारेगोठणे धनगरवाडी, धोपेश्‍वर तिठवली धनगरवाडी, जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, होळी, सडेवाडी, गोठणे दोनिवडे नाचणेकरवाडी २ व ३, कोंढेतर्फ राजापूर कुवळेकरवाडी, धोपटेवाडी, गाडगीळवाडी, गोवळ, ओझर, हसोळ तर्फ सौंदळ खालची लाडवाडी, सोल्ये माळवाडी, मंदरूळ बौध्दवाडी, तळवडे गोसावीवाडी व ग्रामीण रूग्णालय राजापूर यांचा समावेश आहे. यापैकी अनेक गावांची तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणीही केली. सुमारे दीड महिन्याच्या कालावधीनंतरही या गावांना टॅंकर पुरवलेला नाही. प्रशासनकडून टॅंकर उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते. तालुक्‍यातील राज्यकर्ते तालुका टॅंकरमुक्त असल्याचे भासवित आहेत की काय, अशी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्‍यात पडलेल्या वळीवाच्या पावसाने टंचाईग्रस्तांना काहीसा दिलासा दिला. 

टंचाईबाबत सारे मूग गिळून
निवडणुका आल्यावर लोकांच्या घरांचे उंबरठे झिजविले जातात. अधिकारी वा कर्मचाऱ्याने चुकीचे काम केल्यास लोकप्रतिनिधी, समाजसेवक त्याच्या विरोधात ओरड करून जनतेचे आपण तारणहार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाईत टॅंकर उपलब्ध नाही, याबाबत कोणीही ‘ब्र’ काढलेला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com