रेशनवरील कॅशलेसचे स्वप्न लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

राजापूर - रास्त दराच्या धान्य दुकानांवरील व्यवहारात पारदर्शकता यावी म्हणून शासनातर्फे पीओएस (इलेक्‍ट्रॉनिक्‍स पॉइंट ऑफ सेल) मशीन बसविण्यात येणार होत्या; मात्र अद्यापही त्या बसविण्यात आलेल्या नाहीत. तालुक्‍यातील ९७ रास्त धान्य दुकानांवर ४९ हजार २२७ रेशनिंग कार्डधारक रोखीनेच व्यवहार करीत आहेत. शिधापत्रिका आधार कार्ड लिंकशी जोडली गेलेली नसल्याने त्याचा रेशनिंग धान्य दुकानांवरील व्यवहार कॅशलेस करण्यामध्ये अडथळा येत आहे.

धान्य दुकानांवरील व्यवहारांवर नेहमीच संशयाची सुई रोखलेली असते. काही दुकानांत मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी लोक करतात. त्यामुळे असे गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि थेट लाभार्थीला धान्य मिळावे व खरेदी केलेल्या धान्याचे अनुदान थेट ग्राहकाच्या खात्यात जमा करण्यासाठी शासनाकडून डिजिटल पेमेंट, कॅशलेस व्यवहार आणि ऑनलाईन रेशनदुकान अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यातून देशभरात प्रथम स्वयंपाक गॅस अनुदान थेट खात्यात जमा करण्याच प्रयोग राबवण्यात आला असून तो कमालीचा यशस्वी झाला. त्यातूनच धान्य दुकानांसाठी ‘पॉस’ची योजना मांडण्यात आली. शासनमान्य सहकारी किंवा खासगी तत्त्वावर चालणाऱ्या रास्त धान्य दुकानांमध्ये हे कॅशलेस व्यवहार सुरू व्हावेत म्हणून वितरकांना प्रशिक्षणही देण्यात आले. रास्त धान्य दुकानांवरील व्यवहार कॅशलेस करण्यासाठी त्या ठिकाणी पॉस मशीन बसविण्यात येणार होत्या. त्यासाठी शासनाकडून १ जून ही डेडलाईन देण्यात आली होती; मात्र महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्यापही तालुक्‍यातील रेशनिंग धान्य दुकानांवर पॉस मशीन बसवण्यात आलेल्या नाहीत.

निम्मे लाभार्थीच जोडले गेले
९७ रास्त धान्य दुकानांवर ४९ हजार २२७ शिधावाटप कार्डधारक आहे. तालुक्‍यातील २ लाख ५ हजार ९८० लोक लाभ घेत आहेत. रेशनिंग कार्डवरील सर्व लाभार्थी आधार कार्ड लिंकशी जोडण्यात येणार आहेत. त्याला अद्यापही शंभर टक्के यश आलेले नाही. तालुक्‍यातील सध्या निम्म्याहून जास्त रेशनिंग कार्डधारक आधार कार्ड लिंकशी जोडले गेले आहेत.