राजेंद्र माने महाविद्यालयाला ‘सुवर्ण’ श्रेणी

राजेंद्र माने महाविद्यालयाला ‘सुवर्ण’ श्रेणी

औद्योगिक जगताशी निगडित सर्व्हे; कोकणातील एकमेव महाविद्यालयाला मान
साडवली - आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सुवर्ण श्रेणीमध्ये समावेश झाल्यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन (एआयसीटीई) व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये व त्यांची औद्योगिक जगताबरोबर असणारी संलग्नता याविषयी सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये भाग घेण्यासाठी मे ते ऑगस्ट २०१६ या दरम्यान एआयसीटीईच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. २०१६ वर्षासाठी संपूर्ण भारतातून १८२९ अभियांत्रिकी संस्थांनी या सर्व्हेसाठी नावनोंदणी केली; परंतु ८९० संस्थांनीच यशस्वीरीत्या सर्व माहिती भरून सहभाग नोंदवला.

या सर्व्हेमध्ये ६ वेगवेगळ्या परिमाणाद्वारे महाविद्यालयाचे औद्योगिक विश्वाशी असणारे संबंध तपासण्यात आले. यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा महाविद्यालयातील विविध समित्यांमधील सहभाग, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचा औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकल्प, मार्गदर्शन, औद्योगिक प्रशिक्षण, औद्योगिक सहल यासारख्या प्रकारामध्ये सहभाग, विद्यार्थ्यांचे नोकरी लागण्याचे अथवा स्वत:चा व्यवसाय चालू करण्याचे प्रमाण, महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा अशा अनेक परिमाणांचा समावेश होता. सहभागी झालेल्या ८९० संस्थांना प्लॅटिनम, गोल्ड व सिल्वर या तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले. माने अभियांत्रिकी महाविद्यालय हे कोकणातील एकमेव महाविद्यालय सुवर्ण (गोल्ड) श्रेणींमध्ये मानांकन मिळवण्यात यशस्वी झाले. 

सर्व्हेमध्ये सहभागी होण्यासाठी इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॲक्‍शन सेलचे प्रमुख प्रा. राहुल दंडगे व सदस्य प्रा. विकास मोरे, प्रा. इसाक शिकलगार, प्रा. सुमित सुर्वे व प्रा. स्नेहल मांगले यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने यांनी याबद्दल अभिनंदन केले.

दोन आठवड्यांचे प्रशिक्षण अनिवार्य...
राजेंद्र माने महाविद्यालयाने औद्योगिक जगताबरोबर परस्पर संबंध वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. महाविद्यालयातील प्रत्येक विभागाच्या शैक्षणिक सल्लागार समितीमध्ये उद्योग क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला आहे. विविध उद्योग समूहांमधील तज्ज्ञ व्यक्तींना प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेऊन बोलावले जाते. शेवटच्या वर्षातील मुलांचे प्रकल्प हे जास्तीत जास्त औद्योगिक क्षेत्राशी निगडित असण्यावर भर दिला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com