रमाईंच्या माहेराविषयी सरकार उदासीन

रमाईंच्या माहेराविषयी सरकार उदासीन

दापोली - अठरा विश्व दारिद्र्य घरात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबरोबर आयुष्याचा प्रवास करणाऱ्या माता रमाई यांच्या वणंद गावाचा विकास करण्याचे स्वप्न शासनाने रंगविले आहे. त्यासाठी ३६ कोटी ८० लाखांचा विकास आराखडा तयार करण्यात आला; मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबडवे गावाप्रमाणेच वणंद गावाचा आराखडाही केवळ कागदावरच राहिला आहे. शासनाची कोटींची उड्डाणे विकासाचा रथ गावात कधी आणणार याबाबत मात्र आजही अनिश्‍चितताच आहे. दापोली शहरालगत असलेले वणंद हे रमाई भीमराव आंबेडकरांचे माहेर. वणंद येथील भिकूजी धोत्रे आणि रुक्‍मिणी या उभयतांची रमाई ही मुलगी. आई-वडिलांच्या निधनानंतर मामांनी रमाईला व तिच्या भावंडांना मुंबईत आणले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी लग्न झालेल्या रमाईवर समाजासाठी आयुष्य वाहिलेल्या डॉ. बाबासाहेबांचा संसाराचा गाडा ओढण्यासाठी जबाबदारी आली. सातत्याने प्रवास, आंदोलने, सभा यामध्येच गढलेल्या डॉ. बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. अनेक वेळा हितचिंतकांकडून मदत घेऊन, संस्थांनाची शिष्यवृत्ती मिळवून बाबासाहेब शिक्षणासाठी, इंग्रजांबरोबर बोलणी करण्यासाठी, अन्य देशांतील चळवळींची माहिती घेण्यासाठी परदेशी जात असत; परंतु या माऊलीने घरातील आर्थिक स्थितीविषयी कधी तक्रार केली नाही. उलट कार्यकर्त्यांनी देऊ केलेली मदत नाकारून स्वाभिमानाने संसार केला.

वणंद गावातील रमाईंच्या घराला स्मारकाचे स्वरूप देण्याचे काम दि बुद्धिस्ट सोसायटीच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी केले आहे. या स्मारकाला भेट देण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सतत येतात. वणंदमध्ये बौद्धवाडी, गुजरवाडी, दुबळेवाडी, कांगणेवाडी, कातळवाडी, लोवरेवाडी, गवळवाडी या सात वाड्यांचा समावेश आहे. दापोली शहरापासून जवळ असूनही हा गाव विकासापासून दूर आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण, नळ-पाणी योजना, रस्त्यांवर पथदीप यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांची उणीव आहे. माता रमाईंच्या स्मारकस्थळी जाण्यासाठी दापोली शहरातून कोकंबा आळी मार्गे सर्वात जवळचा रस्ता उपलब्ध आहे; मात्र हा रस्ता अरुंद असल्याने मोठी वाहने गावात जाण्यात अडचणी निर्माण होतात.

विधान परिषदेचे आमदार भाई गिरकर यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेत वणंद गाव दत्तक घेतले आहे.  या गावाचा ३६ कोटी ८० लाखांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये माता रमाई स्मारकाजवळ पर्यटकांसाठी विश्रांतीस्थान, सांडपाणी व्यवस्थापन व सुशोभीकरण, स्मारकाजवळ शिल्प सृष्टी, सुसज्ज ग्रंथालय, विपश्‍यना केंद्र, आरोग्य केंद्र, मुलींचे शासकीय वसतिगृह, महाविद्यालय आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सुमारे ३७ कोटी रुपयांची कामे या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com