अर्धवटरावांनी रत्नागिरीकरांना दिला ‘हसत राहा, हसवत राहा’चा संदेश

मकरंद पटवर्धन
बुधवार, 5 एप्रिल 2017

रामदास पाध्ये, अपर्णा पाध्येंची यांची रंगली मुलाखत; बोलक्‍या बाहुल्यांचा उलगडला प्रवास

रत्नागिरी - प्रा. पाध्ये यांचा बोलका बाहुला ‘अर्धवटराव’ शंभर वर्षांचा झाला. पुष्पवृष्टीने स्वागत करून, औक्षण करून चॉकलेट वाटून वाढदिवसही साजरा झाला. बदलत्या समाजजीवनात अर्धवटरावही बदलत गेला आणि त्यामुळेच तो आजवर टिकून राहिला आहे. शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी भारतीय बाहुल्यांचे फ्युजन करत प्रत्येक परदेशी दौऱ्यात नवे खेळ केले. मूर्तिमंत उत्साही, हास्याचा खळाळता झरा, मिश्‍कील, वात्रट अर्धवटरावाने ‘हसत राहा, हसवत राहा, जय जवान, जय मुस्कान’ असा संदेश रत्नागिरीकरांना दिला.

रामदास पाध्ये, अपर्णा पाध्येंची यांची रंगली मुलाखत; बोलक्‍या बाहुल्यांचा उलगडला प्रवास

रत्नागिरी - प्रा. पाध्ये यांचा बोलका बाहुला ‘अर्धवटराव’ शंभर वर्षांचा झाला. पुष्पवृष्टीने स्वागत करून, औक्षण करून चॉकलेट वाटून वाढदिवसही साजरा झाला. बदलत्या समाजजीवनात अर्धवटरावही बदलत गेला आणि त्यामुळेच तो आजवर टिकून राहिला आहे. शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी भारतीय बाहुल्यांचे फ्युजन करत प्रत्येक परदेशी दौऱ्यात नवे खेळ केले. मूर्तिमंत उत्साही, हास्याचा खळाळता झरा, मिश्‍कील, वात्रट अर्धवटरावाने ‘हसत राहा, हसवत राहा, जय जवान, जय मुस्कान’ असा संदेश रत्नागिरीकरांना दिला.

चतुरंग आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने काल अर्धवटरावांसह रामदास पाध्ये व सौ. अपर्णा पाध्ये यांची प्रकट मुलाखत वासंती वर्तक यांनी घेतली. रंगमंचाला खेटून बसलेल्या बालदोस्तांनी आणि तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहाने अर्धवटरावांचा आनंद लुटला.

सुरवातीला पाध्ये दाम्पत्याने या कलेचा प्रवास थोडक्‍यात सांगितला. त्यांनी सांगितले की, चक्रमकाका आणि दंडीशास्त्री या लाकडी मुखवट्याच्या आधारे वडील शब्दभ्रमाचे कार्यक्रम करायचे. त्यानंतर भारतातली पहिला पूर्णाकृती बाहुला अर्थात अर्धवटराव आला आणि मग बायको आवडाबाई, मुले श्‍यामू व गंपू  हे सारे पाध्ये कुटुंबात आले. वडील व अर्धवटराव यांचा संवाद आरशासमोर व्हायचा. पाच-सहा वर्षांचा असताना मीसुद्धा अर्धवटरावाशी बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु तो बोलला नाही. त्या दिवशी वडिलांनी सांगितले, तो बोलणारच नाही. कारण ही एक कला आहे, शब्द फेकण्याची. त्या वयात मला काहीच कळले नाही; पण मी अजाणतेपणी ही कला ११ वर्षे शिकलो. शब्दभ्रम म्हणजे ओठ न हलवता पोटातून बोलणे. आईने ओठातून व वडिलांनी पोटाने बोलायला शिकवले. भारतीय कळसूत्री बाहुल्या व विविध प्रकार शिकलो. वडिलांनी सांगितले होते, कला शिक, पण शिक्षणही झाले पाहिजे. त्यामुळे मी मेकॅनिकल इंजिनिअर व नंतर गणित घेऊन बीएस्सी झालो.

१ मे १९६७ ला वडिलांसोबत पाच मिनिटे पहिला कार्यक्रम केला. त्यानंतर वडील म्हणाले की, ‘मी आता निर्धास्त आहे.’ दुर्दैवाने वडिलांचे निधन ८ मे १९६७ ला झाले आणि पुढील कार्यक्रमात अर्धवटरावाला घेऊन मी कार्यक्रम करू लागलो. येत्या मेमध्ये माझ्या करिअरला ५० वर्षे होत आहेत. दरम्यान, पहिल्या अमेरिका दौऱ्यासाठी विमान खर्च ८ हजार रुपये होता. त्या वेळी एका पत्रकाराने माझे कोकणात २५ दौरे ठेवले व मी पैसे उभे केले. कोकणाने मला कॅलिफोर्निया दाखवला. त्यामुळे कोकणचे ऋण मी विसरू शकत नाही, अशी भावना श्री. पाध्ये यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या आणि अर्धवटरावांच्या संवादांने रसिकांना हास्यसागरात बुडवले. यावेळी पाध्येंनी विचारले ‘नारायण राणे काँग्रेस सोडणार का?’ त्यावर चक्रमकाकांनी नुसतेच डोळे वटारून पाहिले. प्रश्‍न सोपा आहे पण उत्तर कठीण आहे, असे सांगून चक्रमकाकांनी हशा पिकवला.

परदेशात बनवलेला अर्धवटराव कागदाच्या लगद्याचा आहे. आतील बाजूस एकूण ११ कळा, असून डोळे, ओठ, कान, शरीर यांच्या हालचाली व माझ्या पोटातून बोलणे यांचा ताळमेळ बसला पाहिजे. रत्नागिरीमध्येही याचे एखादे शिबिर घेण्याचा मानस पाध्ये यांनी बोलून दाखवला. 

पुस्तकांची संख्या लाख करणार
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात सध्या ९१ हजार पुस्तके आहेत. ही संख्या एक लाखावर नेण्यासाठी वाचक, रसिकांनी एकेक पुस्तक दिल्यास किंवा आपल्याला शक्‍य ती मदत केल्यास होऊ शकेल. बबनराव पटवर्धन यांच्या मदतीमुळे मुंबईतील एका संस्थेने चार लाख रुपयांची देणगी मिळाली. चतुरंगचा हात मिळाल्याने दरमहा सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

चतुरंगची रत्नागिरीत सुरवात
चतुरंगतर्फे ३२ वर्षांपूर्वी ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर सायंकाळी एक रांगोळी, निमित्त संध्या व आता मुक्त संध्या असे अनेक कार्यक्रम होत आहेत. चिपळूणमध्ये १८ वर्षे कार्यक्रम होत असून आता १८० वर्षांची परंपरा लाभलेल्या या वाचनालयाच्या मदतीने रत्नागिरीत चतुरंगने पाऊल टाकल्याची माहिती विद्याधर निमकर यांनी दिली.