'राणे भाजपमध्ये आले तरी फरक नाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मक्तेदारी मोडीत काढण्याचे प्रशिक्षण 
या वेळी श्री. तेली म्हणाले, ‘‘नेता असो वा कार्यकर्ता, पक्षात नव्याने येणाऱ्या सर्व सदस्यांना तीन दिवसाचे प्रशिक्षण घ्यावेच लागते. आपणसुद्धा ते प्रशिक्षण घेतले आहे. यामुळे आता येण्यास इच्छुक असलेल्यांनासुद्धा हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे आता कोणाची मक्तेदारी चालणार नाही.’’ 

सावंतवाडी - काँग्रेसमध्ये चालते ते येथे चालणार नाही. यामुळे नारायण राणे जरी भाजपत दाखल झाले तरी मला कोणताही फरक पडत नाही. आमच्या पक्षात व्यक्तिनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला महत्त्व आहे, असा टोला भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. 

राणेंचा पक्ष प्रवेश हा जर-तरचा प्रश्‍न आहे. यामुळे केसरकर असो की राणे, त्यांच्या विरोधात आम्ही यापूर्वीच्या निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भावना आपण प्रदेश सरचिटणीस म्हणून वरिष्ठांकडे मांडल्या आहेत. यामुळे पुढील निर्णय संघटना ठरविणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

 तेली यांनी आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. या वेळी तालुकाध्यक्ष मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, महेश सारंग आदी उपस्थित होते.

या वेळी तेली म्हणाले, ‘‘पक्षात कोणाला घ्यायचे हा निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. संघटना मजबूत करण्यासाठी किंवा पक्ष वाढविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून काही निर्णय घेतले जातात. त्यात आम्ही बोलणे योग्य ठरणार नाही. राणे हे भाजपत येणार आहे की नाही, याबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. हा जर-तरचा प्रश्‍न आहे; मात्र ते आल्याने मला कोणताही फरक पडणार नाही. त्यामुळे ते आले म्हणून मी का पक्ष सोडू, असा प्रश्‍न करून भाजपत व्यक्तिनिष्ठा चालत नाही तर पक्षनिष्ठा चालते. जे प्रकार काँग्रेसमध्ये चालले ते या ठिकाणी चालतील असे वाटत नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणाची मक्तेदारी चालणार नाही.’’

 मालवण येथे घडलेल्या प्रकाराबाबत ते म्हणाले, ‘‘एकाच वेळी आठ जण समुद्रात मृत्युमुखी पडणे चांगली बाब नाही. त्यांना समुद्रावर असलेल्या स्थानिक लोकांनी पाण्यात जाऊ नका, असा सल्ला दिला होता. असे असताना ते विद्यार्थी पाण्यात गेले आणि पुढील गंभीर प्रकार घडला; मात्र आता याबाबत काळजी घेतली जाणार आहे. झालेला प्रकार पर्यटन मंत्र्यांच्या कानावर मी घातला असून पुढील काळात स्थानिक युवकांचा समावेश असलेली सुरक्षा रक्षकांची टीम समुद्रावर तैनात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.’’

जिल्ह्यात केद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून आलेल्या लाईफ लाईन ट्रेनच्या माध्यमातून कॅन्सरसारख्या रोगाची तपासणी केली जात आहे. त्याचा फायदा येथील लोकांनी घ्यावा, असे तेली यांनी सांगितले.