रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राणेंची भूमिका निर्णायक

 रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राणेंची भूमिका निर्णायक

राजकीय समीकरणे 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोडामार्ग ते चिपळूणपर्यंत पसरला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेल्यावेळी खरी लढत शिवसेना-भाजपचे उमेदवार विनायक राऊत आणि काँग्रेसचे डॉ. नीलेश राणे यांच्यात झाली होती. राऊत यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती. या वेळी शिवसेना आणि भाजपमध्येच मुख्य लढत होण्याची चिन्हे आहेत. गेल्यावेळी या भागातून काँग्रेसचे नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे फारशी ताकद उरलेली नाही. या वेळी शिवसेना-भाजपची युती झाल्यास विरोधकांना आव्हान उभे करणे कठीण बनणार आहे; मात्र या दोघांची युती होण्याची शक्‍यता फार कमी आहे. त्यामुळे मुख्य लढत याच दोन पक्षांत होण्याची शक्‍यता आहे. अर्थात राणेंच्या स्वाभिमान पक्षाच्या भूमिकेवर विजयाची समीकरणे ठरतील.

उमेदवारांची चाचपणी 
शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जाते. तर भाजपकडून केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना निवडणुकीत उतरवले जाण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर ही जागा काँग्रेसला मिळू शकते. अशा स्थितीत कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्‍न आहे. माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांचे नाव पुढे येऊ शकते. स्वाभिमान पक्षासमोर स्वबळावर लढण्याचा किंवा भाजपला पाठिंब्याचा पर्याय असेल. स्वबळावर लढायचे झाल्यास माजी खासदार डॉ. नीलेश राणे हे निवडणूक लढवू शकतात. 

पक्षीय आघाडी 
शिवसेना - या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेच्या जागा येतात. यातील सर्वाधिक म्हणजे पाच जागा सध्या शिवसेनेकडे आहेत. या मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक फळी चांगली आहे. संभाव्य उमेदवार विनायक राऊत यांचा जनसंपर्क चांगला असून संघटनेवरही पकड आहे. अर्थात नाणार प्रकल्पामुळे निर्माण झालेली शिवसेनेबाबतची नाराजी, अंतर्गत गटबाजी, राज्यस्तरावरील राजकीय धोरणाबाबत शहरी मतदारांमध्ये असलेले असमाधान या गोष्टी शिवसेनेला अडचणीच्या ठरू शकतात. 

भाजप - गेल्यावेळी शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला होता. या भागात संघटना बांधणीसाठी खऱ्या अर्थाने गेल्या ३-४ वर्षांतच काम झाले. सिंधुदुर्गाचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरीचे प्रसाद लाड यांच्याकडे निवडणूक फंडे वापरण्याचे, संघटना बांधणीचे कौशल्य आहे. याच बळावर या मतदारसंघात अनेक भागात इतर पक्षातील प्रबळ नेते त्यांनी भाजपत आणले. संभाव्य उमेदवार सुरेश प्रभू यांची ‘इमेज’ ही भाजपसाठी जमेची बाजू आहे. अर्थात नाणार प्रकल्पामुळे ओढवलेली नाराजी, पक्षांतर्गत नाराजी, ग्राऊंड लेव्हलला सक्षम संघटनेचा अभाव आणि समोरचा प्रतिस्पर्धी या गोष्टी भाजपसाठी आव्हान देणाऱ्या ठरणार आहेत. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष - कोकणच्या राजकारणात गेली २८ वर्षे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. या वेळी ते आपल्या स्वतःच्या पक्षासह लोकसभेला सामोरे जाणार आहेत. यावेळीही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः सिंधुदुर्गात त्यांच्याकडे चांगली वोट बॅंक आहे. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यास शिवसेनेसाठीचे आव्हान कठीण होणार आहे. स्वाभिमानने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तर माजी खासदार डॉ. नीलेश राणे उमेदवार असू शकतात. एखादेवेळी स्वतः नारायण राणे रिंगणात उतरले तर मतदारसंघाची बरीच गणिते बदलू शकतात. अर्थात रत्नागिरी जिल्ह्यातही स्वाभिमानला बळ वाढवावे लागेल.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस - या दोन्ही पक्षांचे निवडून येण्याइतके बळ सद्यस्थितीत तर राहिलेले नाही. दोघांचीही आघाडी झाली तर पक्षीय धोरणांना मानणारा वर्ग मतदान करणार आहे. याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. अर्थात काँग्रेसकडे जागा गेल्या भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई तर राष्ट्रवादीकडे जागा गेल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील एखादा उमेदवार रिंगणात उतरेल.

मतदारसंघवार स्थिती अशी -

सावंतवाडी विधानसभा  दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्‍याचा समावेश असलेल्या या मतदारसंघात पालकमंत्री दीपक केसरकर अर्थात शिवसेनेचे बळ आहे; मात्र स्वाभिमान, भाजप हेही आपली ताकद राखून आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वाभिमानकडे बऱ्यापैकी बळ आहे. माजी आमदार राजन तेलींच्या माध्यमातून भाजपनेही ताकद गोळा केली आहे. प्रभू आणि राऊत यांच्यात लढत झाली व स्वाभिमानने भाजपला साथ दिली तर ‘काँटे की टक्कर’ होण्याची शक्‍यता आहे; मात्र स्वाभिमान स्वतंत्र लढल्यास चित्र वेगळे दिसेल. अर्थात अंतर्गत नाराजी थोपविण्याचे आव्हान सर्वच प्रमुख पक्षांसमोर असणार आहे. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीची वोट बॅंकही आहे. 

कुडाळ मतदारसंघ
येथे प्रामुख्याने शिवसेना आणि स्वाभिमानची ताकद आहे. आगामी विधानसभा येथून राणे कुटुंबीयातील स्वतः राणे किंवा नीलेश/नीतेश राणे लढण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीची रंगीत तालीम असलेली लोकसभा स्वाभिमान पूर्ण ताकदीने लढेल. येथे भाजपची ताकद गेल्या वेळच्या तुलनेत वाढली आहे. प्रभू उमेदवार असतील तर शहरी भागात भाजपला बळ मिळण्याची शक्‍यता आहे. श्री. राऊत यांच्याशी येथील आमदार वैभव नाईक यांचे असलेले सख्य पाहता तेही पूर्ण ताकद लावणार असल्याने लोकसभेवेळी येथे चुरस अपेक्षित आहे. 

कणकवली मतदारसंघ
विद्यमान आमदार नीतेश राणे यांनी हा मतदारसंघ संघटनात्मकदृष्ट्या सक्षमपणे बांधला आहे. येथे शिवसेनेची ताकद तुलनेत कमी आहे. अलीकडे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेना वाढीसाठी प्रयत्न आहेत. भाजपची येथे पूर्वीपासून ताकद आहे. असे असले तरी हा मतदारसंघ स्वाभिमान किंवा त्यांच्या मित्र पक्षाला बळ देईल, अशी  स्थिती आहे.

राजापूर-लांजा मतदारसंघ
नाणारचा प्रकल्प याच मतदारसंघात येतो. या प्रकल्पाने बाधित १४ गावे व आजूबाजूचा परिसर शिवसेनेचा गड राहिलेला आहे. ही मते टिकवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असेल. भाजपने या प्रकल्पास पाठिंबा दिल्याने नाणारग्रस्तांची मते शिवसेनेला मिळाली नाही तर ती काँग्रेसकडे जाऊ शकतात. या मतदारसंघात काँग्रेसची पारंपरिक मते बऱ्यापैकी आहेत. संघटना बांधणीत अलीकडे भाजपने बऱ्यापैकी भर दिला आहे; मात्र शिवसेनेकडे संघटन आहे. प्रमुख स्पर्धकांच्या तुलनेत स्वाभिमानची ताकद मात्र येथे मर्यादित आहे.

रत्नागिरी मतदारसंघ
येथे शिवसेनेचे संघटनात्मक बळ चांगले आहे. संपर्कप्रमुख प्रसाद लाड सक्रिय झाल्यापासून येथे भाजपची ताकदही वाढत आहे. श्री. प्रभू उमेदवार असल्यास शहरी भागात ते बऱ्यापैकी मते मिळवू शकतात; पण ग्रामीण भागात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपला मजबूत संघटन उभारावे लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानचे बळ शिवसेना-भाजपच्या तुलनेत कमी आहे.

चिपळूण मतदारसंघ
येथेही शिवसेना मजबूत स्थितीत आहे; मात्र भाजप वाढत आहे. मध्यंतरी येथील नेते रमेश कदम राष्ट्रवादीतून भाजपमध्ये व तेथून काँग्रेसमध्ये गेले; मात्र त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले काही कार्यकर्ते स्थिरावले. त्यांच्यासह प्रसाद लाड सक्रिय झाल्याने होत असलेले संघटनात्मक बदल भाजपला फायद्याचे ठरत आहेत. स्वाभिमानची ताकद भाजपच्या पाठीशी राहिल्यास शिवसेनेसमोर आव्हान उभे राहील.

मुख्य लढत शिवसेना आणि भाजपमध्येच होईल अशी आजची स्थिती आहे. सुरेश प्रभू आणि विनायक राऊत यांची तुलना करता प्रभू यांचे देशस्तरावर मोठे काम आहे; मात्र राऊत यांची संघटनेवरील पकड आणि जनसंपर्क दांडगा आहे. स्वाभिमान स्वतंत्र लढण्यापेक्षा भाजपला पाठबळ देण्याचीच जास्त शक्‍यता आहे.
- अशोक करंबळेकर,
राजकीय विश्‍लेषक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com