‘शिवशाही’च्या वेगावर चिपळूणकर नाराज

‘शिवशाही’च्या वेगावर चिपळूणकर नाराज

चिपळूण -  राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करून चिपळूण ते पुणे शिवशाही बस सुरू केली. मात्र पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवशाहीला तब्बल १० तास लागतात. प्रवासात जाणारा वेळ, वाढीव तिकीट आणि आरामही मिळत नसल्याने प्रवाशांना शिवशाहीचा प्रवास नकोसा झाला आहे. शिवशाहीपेक्षा एसटीचा लाल डबा परवडला, अशा प्रतिक्रिया आता प्रवाशांमधून उमटू लागल्या आहेत.

चिपळूण आगारातून सकाळी सात, साडेनऊ आणि दुपारी एक अशा तीन शिवशाही बस पुणे मार्गावर धावतात. चिपळूण ते पुणे या प्रवासाला साध्या व निमआराम एसटीला पाच तास लागतात. मात्र शिवशाही बसने प्रवास करताना काहीवेळा दहा तास लागतात. पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी वाहतुकीच्या गाड्याही शिवशाही बसपेक्षा लवकर पोहचतात. तसेच शिवशाहीपेक्षा एसटीच्या निमआराममधील तसेच खासगी गाड्यांचा प्रवास अधिक आरामदायी होतो. शिवशाही बसला प्रतिसाद मिळावा म्हणून पुणे मार्गावरील निमआराम फेऱ्यांची संख्या एसटीने कमी केली. शिवशाहीचे तिकीट ४१४ रुपये आहे. निमआराम बसचे तिकीट ३५० रुपये आहे. निमआराम बसची संख्या कमी झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांना शिवशाहीनेच प्रवास करावा लागतो. शिवशाहीचा प्रवास गैरसोयीचा असल्यामुळे पर्याय म्हणून लोक खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. 

शिवशाही बसमधील वाहकाचे आसन आणि चालकाच्या पाठीमागील आसन सोडल्यास अन्य सर्वच आसने अत्यंत गैरसोयीची आहेत. 
- सुरेश कदम
, कापरे (ता. चिपळूण)

शिवशाही वातानुकूलित असली तरी अनेकवेळा एसी बंद असतो. प्रवास करताना कंटाळा येतो. बस वेळेवर पोचत नाही. चिपळूण ते कोयना एक तासात पोहचणे अपेक्षित असताना २ तास लागतात. 
- श्‍वेता शेट्ये
, पुणे

शिवशाही बस ही अत्यंत महागडी आहे. तिच्या दर्शनी भागाला दोन्हीकडे लावलेल्या एकेका आरशाची किंमत ३५ हजार रुपये आहे. सध्या सगळीकडे वाहतूक कोंडी आहे. दुचाकीचालक बेशिस्तीने गाड्या चालवतात. रिक्षा आणि छोटी मालवाहू वाहने कोणतेच नियम पाळत नाहीत. अशा स्थितीत जर शिवशाहीच्या बसला चरा गेला किंवा ओरखडा ओढला गेला तरी त्याच्या दुरूस्तीसाठी २५ हजार रुपये मोजावे लागतात. त्याची वसूली चालकाच्या पगारातून केली जाते. भरपाईपोटी कापली जाणारी रक्कम पगारापेक्षा अनेक पटीत असल्यामुळे चालक वेगाने बस चालवित नाहीत. त्यामुळे अधिक वेळ लागतो, असे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com