रत्नागिरी जिल्ह्यातील एटीएम ड्राय, कॅशलेसचा अनुभव

रत्नागिरी जिल्ह्यातील एटीएम ड्राय, कॅशलेसचा अनुभव

१५२ मशिन्स - दिवसाला ४ कोटींची आवश्‍यकता; रिझर्व्ह बॅंकेकडून चलनपुरवठा नाही 

रत्नागिरी - जिल्ह्यातील ९५ टक्के एटीएम गेली आठ दिवस बंद आहेत. रिझर्व्ह बॅंकेकडून चलनपुरवठा न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक एटीएम ‘ड्राय’ झाल्याने खातेदारांची पंचाईत झाली आहे.

नोटाबंदीनंतर प्रथमच या समस्येला ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. बंदी आदेशानंतर अनेकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक साठवणूक केल्याने बॅंकेतील देवाण-घेवाण व्यवहार घटले आहेत. कॅशलेश व्यवहाराचाही यावर परिणाम झाल्याचा अंदाजही बॅंक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.  

जिल्ह्यात विविध ३२ बॅंकांची सुमारे १५२ च्यावर एटीएम मशीन आहेत. बॅंक ऑफ इंडियासह, महाराष्ट्र बॅंक आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया आदी बॅंकांच्या एटीएममध्ये दिवसाला साधारण ४ कोटी रुपये लागतात. एका एटीएमची दिवसाची मर्यादा ६ लाख आहे, परंतु गेले पंधरा दिवस स्टेट बॅंकेकडून एका एटीएमला २ लाख याप्रमाणे चलन पुरवले जाते. रिझर्व्ह बॅंकेकडूनच आर्थिकपुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात सर्वंच बॅंकांची एटीएम ड्राय झाली आहेत. अनेक ग्राहक विविध बॅंकांच्या एटीएममधून फेऱ्या मारत आहेत, परंतु बहुतेक बॅंकेची एटीएमम बंद आहेत. त्यापैकी केवळ १० टक्के एटीएम ही तांत्रिकदृष्ट्या बंद आहेत. पुरवठा थांबल्याने ग्राहकांची मोठी अडचण झाली आहे. मे महिन्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे, मात्र एटीएममधील कॅश संपल्याने पर्यटकांचे हाल झाले. आर्थिक परिस्थिती सुधारण्याला आणखी किती दिवस लागतील, याचा अंदाज नाही, असेही बॅंक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

याबाबत बॅंक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी श्री. बांदिवडेकर म्हणाले, ‘‘गेली दहा ते पंधरा दिवस हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्टेट बॅंकेकडून आम्हाला कॅश पुरवली जाते; मात्र रिझर्व्ह बॅंकेकडूनच कॅश न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात कॅशचा तुटवडा निर्माण झाला आहे. बहुतेक एटीएम रिकामी झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली आहे. आहे. पैसे आले की एटीएम सुरू होतील.’’

रिझर्व्ह बॅंकेकडून कॅशपुरवठा न झाल्याने आर्थिक तुटवडा भासत आहे. जिल्ह्यातील एटीएम त्यामुळे बंद आहेत. यापूर्वी पैशांची मोठी उलाढाल असायची. पैसे इकडचे तिकडे वापरून वेळ काढता येत होता. नोटबंदीनंतर अनेकांनी कॅश साठवून ठेवली आहे. त्याचा बॅंक व्यवहारावर परिणाम झाला आहे.
- विलास वरसकर, मुख्य प्रबंधक, बॅंक ऑफ महाराष्ट्र 

विविध बॅंकांचे एटीएम (आकडेवारी अद्ययावत नाही)

स्टेट बॅंक ऑफ इंडिया   २७

बॅंक ऑफ इंडिया       ३५

सेन्ट्रल बॅंक     ७

आयसीआयसीआय बॅंक           ९

युनियन बॅंक       ९

बॅंक ऑफ महाराष्ट्र         १२ 

सारस्वत बॅंक       ४

जनता बॅंक     ४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com