रत्नागिरी : हापूसची परदेश वारी; पाच टन निर्यातीची भरारी

अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाला रवाना दोन वर्षांनी प्रारंभ
रत्नागिरी हापूसची परदेश वारी; पाच टन निर्यातीची भरारी
रत्नागिरी हापूसची परदेश वारी; पाच टन निर्यातीची भरारी sakal

रत्नागिरी: कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर दोन वर्षांनी हापूस आंब्याच्या अमेरिकावारीला मुहूर्त मिळाला. वाशीतील विकिरण केंद्रातून निर्यात झालेल्या ११ टन आंब्यात साडेतीन टन हापूस अमेरिकेला आणि दीड टन ऑस्ट्रेलियाला हवाईमार्गे पाठविण्यात आला आहे. हवाई वाहतुकीचा किलोचा दर तिप्पट झाल्याने निर्यातीकडील कल कमी आहे.भारतातील आंब्याला विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निर्यातीपूर्वी विविध प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अमेकिरेला आंबा पाठविताना विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे. वाशी, लासलगाव या दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.

हंगाम सुरू करण्यापूर्वी अमेरिकेतील कृषी विभागाकडून विकिरण केंद्रांची पाहणी करून सर्टिफिकेट दिले जाते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे अमेरिकेतील पथकाला भारतामध्ये येणे शक्य झाले नव्हते. परिणामी हापूसची अमेरिकेला निर्यातच झाली नाही. भारतामधून होणाऱ्या एकूण निर्यातीत वीस टक्के हापूसचा समावेश असतो. यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ४ एप्रिलला अमेरिकेच्या पथकाने वाशीसह लासलगाव केंद्रांची पाहणी करून हिरवा कंदील दिला. वाशीमधून ६ एप्रिलला १२०० किलो हापूस सर्वप्रथम हवाईमार्गे पाठविण्यात आला. आतापर्यंत वाशीतून ११ टन विविध प्रकारचे आंबे निर्यात केले गेले.

अमेरिकेला गेलेल्या ८ टन आंब्यांमध्ये ३.५ हापूस, ३ टन केशर आणि १.५ टन बदामीचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलियाला गेलेल्या ३ टनांमध्ये १.५ टन हापूस, १.५ केशर आहे. वाशीप्रमाणेच लासलगावमधून पेट्या गेल्या. तीन टन आंब्यामध्ये पन्नास टक्के हापूस असल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेला हापूसची निर्यात सुरू झाली असून, वाशीमधून नियमित कन्साईनमेंट पाठवली जात आहे. यंदा जास्तीत जास्त एक हजार टन हापूस निर्यात करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे.

- भास्कर पाटील,सरव्यवस्थापक, पणन

आठवडाभरानंतर वाशी बाजारपेठेतील आवक थोडी वाढली आहे. स्थानिक पातळीवर हापूसचा दर वधारलेला असल्याने निर्यातीकडील कल कमी आहे. २५ एप्रिलनंतर मुबलक आंबा उपलब्ध होईल.

- संजय पानसरे,वाशी बाजार समिती

युद्धाचा भुर्दंड व्यावसायिकांना

दरम्यान, गेल्या काही दिवसांत युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाचे दर वाढले आहेत. त्याचा फटका हापूस निर्यातीलाही बसला. विमानाने होणाऱ्‍या वाहतुकीसाठी किलोला ५५० रुपये आकारले जात आहे. हाच दर पूर्वी १७५ रुपये प्रतिकिलो होता. दरात तिप्पट वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड व्यावसायिकांना बसला आहे.

विकिरण प्रक्रिया म्हणजे काय?

लासलगावच्या केंद्रात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com