बिल्डरांच्या आडून थेट नगराध्यक्षांवर शरसंधान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पालिकेत स्वकीयांकडूनच कोंडी : बिल्डरधार्जिणेपणाचा आरोप

पालिकेत स्वकीयांकडूनच कोंडी : बिल्डरधार्जिणेपणाचा आरोप
रत्नागिरी - बिल्डरांच्या परवानग्या पंधरा दिवसांत आणि सर्वसामान्यांना कागदपत्रांसाठी प्रतीक्षा करावी लागते, असे बजावत बंड्या साळवी, राजेश सावंत यांनी पालिकेच्या कारभारावरच ताशेरे ओढले. शिवसेनेच्या नेत्यांनी केलेले हे शरसंधान नगराध्यक्षांच्या दिशेने होते; मात्र त्याची जबाबदारी प्रशासनावर ढकलून नगराध्यक्षांनी सोडवणूक करून घेतली. बिल्डरांच्या परवानग्या थांबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. बिल्डरांच्या परवानगीसाठी नगरसेवकांनी पुढे येऊ नये, अशी तंबीही सर्वांना दिली. या प्रश्‍नावरून नगराध्यक्षांची स्वकीयांनीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

शिवसेनेचे नगरसेवक साळवी यांनी अनेक सर्वसामान्यांची साडेसातशे प्रकरणे प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. उपनगराध्यक्षांनी त्याला दुजोरा दिला. त्यावर कारवाई काय करणार असेही विचारले. शिवाजीनगर येथील बांधकामाच्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यावर कार्यवाही नाही, सामान्यांचे प्रश्‍न विलंबित, बिल्डरांच्या परवानग्यांसाठी सुटीच्या दिवशीही कामकाज, बिल्डरांना पाण्याची जोडणी लगेच, त्यामुळे बांधकामासाठी त्याचा वापर असे मुद्दे त्यांनी मांडले. पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि पालिका बांधकामासाठी पाणी द्यायला पुढे, अशी टीका झाली.  मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी रविवारी बिल्डर व नागरिकांना पालिकेत मनाई करण्यात येईल, असे सांगितले. नगराध्यक्ष म्हणाले, की बिल्डरांची परवानगी रोखण्यासाठी सर्वांनी स्ट्राँग राहिले पाहिजे. कारभारात बदल घडविणारच. प्रशासनाने कडक भूमिका घेतली पाहिजे; मात्र नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये. 

याप्रसंगी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्यपदी राजू तोडणकर आणि वैभवी खेडेकर यांची 
निवड झाली.

‘ती’ जागा ताब्यात घेणार
‘नो पार्किंग’ झोनमधील पकडलेल्या गाड्या ठेवण्यासाठीची जागा पालिका ताब्यात घेणार आहे. त्याला टाळे ठोकणार आहे. कंत्राटदाराला जागा फुकट वापरू देण्यास आक्षेप घेण्यात आला. वाहनचालकांकडून वसूल करावयाचा दंड कमी करावा, अशी सूचना काही नगरसेवकांनी केली. शहरातील सिग्नल येत्या दोन महिन्यांत सुरू होतील. त्यासाठी तंत्रज्ञांची मदत घेतली जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले.