पाच राज्यांचा चेहरामोहरा बदलणार

पाच राज्यांचा चेहरामोहरा बदलणार

सागरी महामार्ग २१५० कि.मी. लांबीचा - ४२ खाड्यांनीही व्यापणार

रत्नागिरी - गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ या राज्यांचा चेहरामोहरा २१५० कि.मी. लांबीच्या सागरी महामार्गामुळे बदलणार आहे. गुजरातच्या लखपत गावापासून सुरू होऊन केरळच्या कोचीनपर्यंत हा मार्ग धडकेल. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील झाई गावापासून सुरू होणारा हा मार्ग रेवस, रेवदंडा, दाभोळ, जयगड, मालवणमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातार्डे गावापासून गोव्यात शिरेल. पणजीपासून थेट कोचीनपर्यंत ७३१ कि.मी. लांबीचा महामार्ग सध्या किनारपट्टीने जातो. प्रवासात सतत उजव्या दिशेला समुद्राचे विलोभनीय दर्शन होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या पूर्ततेकरिता तब्बल दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून कोकणवासीयांनी अनेक वर्षे उराशी बाळगलेल्या स्वप्नाला बळ दिले. मुंबई-गोवा महामार्गाचा चौपदरीकरणाबरोबरच सागरी महामार्गाचा प्रश्‍न मार्गी लागल्याने पुढील महिन्यात गणेशोत्सवाला येणाऱ्या लाखो गणेशभक्तांना गणराय पावला असेच म्हणावे लागेल, असे ॲड. विलास पाटणे यांनी सांगितले.

या मार्गासाठी झालेल्या पहिल्या परिषदेचे ते साक्षीदार आहेत. ४२ खाड्यांनी व्यापलेल्या, नारळी-पोफळीच्या निसर्गाने नटलेल्या डोंगराळ प्रदेशाच्या कोकण किनारपट्टीने जाणाऱ्या या महामार्गावरील प्रवासही पर्यटनाचा भाग असेल. महामार्गाचे मुंबईचे सध्याचे अंतर १०५ कि.मी.ने कमी होऊन प्रवासाची वेळ किमान दीड तासाने कमी होईल. कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला गती मिळेल. आंबा उत्पादन व मच्छीमारी व्यवसायाला ऊर्जितावस्था येईल. बहुतांशी हापूसच्या बागायती, मच्छीमारी व्यवसाय किनारपट्टीलगत असल्याने महामार्गाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. 

कोकणात बंदर विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याने सुलभ वाहतुकीचा चांगला पर्याय उपलब्ध होईल. देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महामार्गाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कोस्टगार्डचा रत्नागिरीचा नाविक तळही महामार्गाला जोडता येईल, याकडे पाटणे यांनी निर्देश केला.

१० हजार कोटींचे पॅकेज...
रस्ते ४२८१ कोटी, वळणरस्ते ९२८ कोटी, छोटे पूल ९६५ कोटी, मोठे पूल ३८८ कोटी, सुशोभीकरण २०० कोटी व जमीन संपादन ३२०० कोटी अशा प्रकारे दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज आहे. डीपीआरनंतर अंतिम मंजुरी झाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com