विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यासाठी धडपड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - तालुक्‍यातील कुर्धे येथील पडक्‍या विहिरीत बिबट्या पडला. आज सकाळी ही बाब लक्षात आली. बिबट्याला विहिरीतून काढून जीवदान देण्यासाठी वन विभागासह कुर्धेवासीयांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते; मात्र विहिरीचे मुख छोटे असल्याने पिंजरा आत सोडण्यात अडचणी येत होत्या. आज सायंकाळनंतर हे प्रयत्न थांबविण्यात आले. बिबट्या जिवंत असून त्याला उद्या बाहेर काढू, असा विश्‍वास वन विभागाने व्यक्त केला आहे.

कुर्धे परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे येथील ग्रामस्थांकडून वारंवार सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वी येथील एका वासरावरही बिबट्याने हल्ला केला होता. लोकवस्तीपासून काही अंतरावर असलेल्या पडक्‍या विहिरीतून गुरगुरण्याचा आवाज येत होता. ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर विहिरीत खोलगट भागात बिबट्या अडकून पडल्याचे लक्षात आले. भक्ष्याचा पाठलाग करताना तो पडला असावा अंदाज वर्तविला जात आहे.