स्कूबा डायव्हिंग, भाट्ये सैरमुळे पर्यटनाला झळाळी

भाट्ये खाडीतील मॅग्रोव्हजचे बेट.
भाट्ये खाडीतील मॅग्रोव्हजचे बेट.

रत्नागिरी - ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांना झळाळी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पावले उचलली जात आहेत. मिऱ्या येथील स्कूबा डायव्हिंगसह भगवती बंदरची केव्ह, भाट्ये खाडीतील सैर आणि व्हॅलिक्रॉसिंग या नावीन्यपूर्ण उपक्रमांची भर पडल्याने पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. शासनाने जिल्ह्यातील चाळीस पर्यटनस्थळांवर पर्यटन सुविधा आणि समुद्रकिनारी वॉटर स्पोर्टस्‌ सुरू करण्यासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकासमधून अकरा कोटींचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत त्यातील एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या मिऱ्या येथे समुद्रातील खजिना पाहण्याची सुविधा हौशी तरुणांनी करून दिली आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प सुरू करणे शक्‍य झाले. ख्रिसमसच्या सुटीमध्ये अनेक पर्यटकांनी रत्नागिरीला प्राधान्य दिले होते. अलावा समुद्रातील प्रवाळ बेट, अनेक प्रकारचे रंगीत मासेही डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. हजारो पर्यटकांनी भेट देऊन याचा आनंद लुटला. 

भाट्ये ते कर्ला खाडीत नौकानयनाचा आनंद घेण्याची सुविधा होती. भाट्ये खाडीच्या बरोबर मध्यभागी मॅग्रुव्हचे बेट आहे. तेथे विविध प्रकारचे पक्षी, प्राणी वास्तव करतात. पाण्याच्या मधोमध असलेले हे बेट अभ्यासकांबरोबरच पर्यटकांसाठीही आगळावेगळा आनंद देणारे आहे.

भाट्ये येथे दोनशे फुटावरून व्हॅली क्रॉसिंगचा आनंद पर्यटकांना घेण्यासाठी रत्नदुर्ग माउंटेनिअरिंगने उपक्रम राबविला आहे. भगवती किल्ल्याजवळील केव्हमधून सफर करतानाचे साहस नक्‍कीच पर्यटकांसाठी वेगळा अनुभव देऊ शकते. या गुहेत नक्‍की काय दडलय हे जाणून घेण्यासाठी स्थानिक नागरिकांमध्येही तेवढीच उत्सुकता आहे. या दुर्लक्षित पर्यटनस्थळांना या दोन वर्षात झळाळी मिळत आहे. 

पर्यटनस्थळांवर जाणारे रस्ते, स्थळ दर्शविणारे फलक, प्रसाधनगृह व स्वच्छतागृह, जलक्रीडा उपकरणे, स्वागत कक्ष, रस्ते बांधणे, बीच बेंचीस, चेअर, निवासासाठी तात्पुरते तंबू, माहिती कक्ष, शिखारी बोट उपलब्ध करून देण्यासाठी किनारी भागांसह जिल्ह्यातील चाळीस ठिकाणांची ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत निवड केली होती. त्यासाठी २०१५-१६ आणि १६-१७ या दोन वर्षात आठ कोटी रुपयांची कामे सुचविण्यात आली. 

शासनानेही ऑगस्ट २०१७ मध्ये वर्कऑर्डर दिली असून साडेअकरा कोटींचा निधी मंजूर केला. अपेक्षित निधीपेक्षा दीड कोटी रुपये जास्त तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत एक कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील दोन वर्षात पर्यटकांसाठी सुविधा देण्यावर शासनाने भर दिला आहे. किनारी भागात वॉटर स्पोर्टस्‌ सुरू केला तर पर्यटक तेथे थांबतील असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.

भाट्ये खाडीत सैर करण्यासाठी वर्षाला ३० ते ३५ ग्रुप मिळतात. गेली आठ वर्षे हा उपक्रम सुशेगाद जलविहारच्या माध्यमातून राबवत आहोत. पर्यटकांना त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- संजीव लिमये, नौका सफर आयोजक

ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाकडून मिळालेल्या निधीतून कामे सुरू आहेत. पर्यटकांना सुविधा देणे आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
- विश्‍वास सीद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com