शिवसेनेत मध्यावधीची झुळूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

रत्नागिरी - राज्यात मध्यावधी निवडणुकांचे वाहणारे वारे कधी थांबतात, तर कधी वेगाने वाहतात; परंतु शिवसेनेने त्यादृष्टीने मतदारसंघ बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश विद्यमान आमदारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरीत पाली येथे झालेल्या बैठकीत आमदार उदय सामंत यांनी मध्यावधीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहा, अशा सूचना दिल्या आहेत.

रत्नागिरी - राज्यात मध्यावधी निवडणुकांचे वाहणारे वारे कधी थांबतात, तर कधी वेगाने वाहतात; परंतु शिवसेनेने त्यादृष्टीने मतदारसंघ बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश विद्यमान आमदारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरीत पाली येथे झालेल्या बैठकीत आमदार उदय सामंत यांनी मध्यावधीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहा, अशा सूचना दिल्या आहेत.

सोमवारी (ता. २६) सायंकाळी उशिरा शिवसेनेची पाली येथे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, विभागप्रमुख आणि अन्य पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे संघटनेसाठी योगदान, ग्रामपंचायत निवडणूक, प्रत्येक बूथप्रमुख, पक्षप्रवेशावर सविस्तर चर्चा झाली. सभागृहात पक्षाच्या नगरसेवकांमध्ये समन्वय असावा, अशी सूचना एका नगरसेवकाने केली. हातखंबा येथील एका पदाधिकाऱ्याने पक्षाच्या बैठकीचे निमंत्रणच मिळत नाही, अशी तक्रार केली.

शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील अहवाल पक्षाला सादर करावयाचा आहे. त्यानुसार आढावा बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे ही बैठक झाली. सदस्य, नगरसेवकांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत लोकांपर्यंत पोचून विकासकामे करावीत, अशा सूचना आमदार सामंत यांनी बैठकीत दिल्या. निवडणुका लागल्याच तर त्यासाठी सज्ज राहा, असे त्यांनी सांगितले. पक्ष बदलासंदर्भात वावड्या उठविल्या जातील, त्याकडे कुणीही लक्ष देऊ नका, असेही सामंत यांनी बजावले. ऑक्‍टोबरनंतर रत्नागिरी तालुक्‍यात २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यातील २४ ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. गाव पॅनेल असलेल्या पाच ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्याचे आवाहन तालुकाप्रमुख साळवी यांनी केले.

‘राष्ट्रवादी’चा नेता शिवसेनेच्या वाटेवर
तालुक्‍यातील राष्ट्रवादीचा एक नेता शिवसेनेच्या वाटेवर आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाविरोधात गेलेल्यांच्या घरवापसीवरही या बैठकीत चर्चा झाली. पक्षात घेताना स्थानिक शिवसैनिकांचे मत विचारात घ्‍यावे, अशी सूचना केली.