गॅस पाईपलाईन सुरक्षेबाबत मौन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - जयगड-चिपळूण गॅस पाईपलाईन टाकण्याच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही; परंतु हा ज्वालाग्रही गॅस आहे. जमिनीखालून ती टाकली जाणार आहे. काही कि.मी.पर्यंतचे लोक त्यामुळे बाधित होणार आहेत. सुरक्षेच्या हमीबाबत बोलले जात नाही. जिल्हा प्रशासनाने याची जनसुनावणी घ्यावी. ही जागा संपादित करून बाजाराभावाप्रमाणे त्याचे दर जाहीर करावेत. या मागण्या मान्य न केल्यास प्रकल्पाला विरोध राहील, असा इशारा नांदिवडे, चाफेरी, वाटद, सत्कोंडी, जांभारी आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला. 

वाटद येथील सभागृहामध्ये पत्रकार परिषद झाली. या वेळी शरद बोरकर, बाबू पाटील, विवेक सुर्वे, नंदू केदारी, बाळशेट जोग, शशिकांत मुळ्ये, अप्पा काणे, जयवंत आढाव, अनिल गडदे, प्रकाश जाधव, प्रताप सुर्वे, अमोल बैकर, संदीप विचारे, धुळप आदी उपस्थित होते. 

ग्रामस्थांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने पहिली नोटीस काढल्यानंतर २१ दिवसांत म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. गॅस पाईपलाईन टाकण्यामध्ये साधारण ६० फुटांची जागा जात आहे. निवळी-जयगड ही पाईपलाईन टाकली होती. त्याचा अनुभव गाठीशी आहे. 

त्याचे जुजबी भाडे दिले जाते. ज्या पाच गावांतून ही पाईपलाईन जाणार आहे, त्या भागातील सर्व जमीन कंपनीने संपादित करावी. पाईपलाईन टाकून काही भाग कंपनी सुरक्षित करणार. शेतकऱ्यांच्या नावावर ही जमीन राहूनदेखील त्याचा शेती किंवा फळबाग करण्यासाठी काहीच उपयोग होणार नाही.

प्रकल्पाला आमचा विरोध नाही; पण कंपनीने जनसुनावणी घेऊन संपूर्ण माहिती लोकांना द्यावी. लोकांच्या शंकांचे निरसन झाले की, विरोधाचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. घेण्यात येणाऱ्या जमिनीला महामार्गाप्रमाणे दर जाहीर करावा.

लेखी हमी द्यावी....
जनसुनावणी कायद्यामध्ये घेता येत नाही, असे जिल्हा प्रशासनाचे मत असेल, तर त्यांनी या प्रकल्पामुळे काही धोका नाही, अशी लेखी हमी द्यावी, असे मत शरद बोरकर, सुर्वे, पाटील, केदारी यांनी व्यक्त केले. जैतापूर, जेएसडब्ल्यू, फिनोलेक्‍स कंपन्या होण्यापूर्वी त्यांचीही जनसुनावणी झाली होती. त्यामुळे त्यासाठी आमचा आग्रह आहे. आमच्या मागण्या मान्य न केल्यास प्रकल्पाला विरोध करू. वेळ प्रसंगी, मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना भेटू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.