स्वाईन फ्लू रुग्णाला दिली मरणोत्तर अस्पृश्‍य वागणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

स्वाईन फ्लू संसर्गजन्य असला तरी चार तासांहून अधिक काळ त्याचे जंतू जिवंत राहत नाहीत. मृतदेह उचलल्यास संसर्ग होतो, असा समज चुकीचा आहे. असे गैरसमज दूर व्हायलाच हवेत.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी.

रत्नागिरी - स्वाईन फ्लूने मृत्यू ओढवलेल्या रुग्णाला देवरूखसारख्या गावात मृत्यूनंतर अस्पृश्‍याची वागणूक मिळाली. त्याचा मृतदेह त्याच्या घरातही नेऊ दिला नाही. अंगणातच तो ठेवला गेला. मृतदेहाला उचलायला कोणी पुढे आले नाहीत. अंत्यदर्शनही दूरवरून घेण्यात आले. स्मशानातही लोक ५० फूट दूर उभे होते. स्वाईन फ्लूने होणाऱ्या कथित संसर्गाबाबत अज्ञानातून हे सगळे झाले. त्यामुळे याबाबत प्रबोधन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. तसेच वैद्यकीय व्यावसायिकांचीही.

नुकतेच देवरूखातील किशोर जोशी यांचे स्वाईन फ्लूमुळे कोल्हापुरातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यानंतर हा प्रकार घडला, अशी माहिती जोशी यांचे नातेवाईक संतोष कुलकर्णी यांनी दिली. ते म्हणाले, जे घडले त्यामुळे अनेक प्रश्‍नांचे वादळ आले. रुग्णाला कोल्हापूरला हलवले तेव्हा त्याची तिसऱ्या स्टेजमधील लक्षणे दिसत होती. तेव्हा डॉक्‍टरांचेही या आजाराबाबत प्रबोधन आवश्‍यक आहे. रुग्ण कोल्हापुरात जाताच डॉक्‍टरांनी हा स्वाईन फ्लू आहे व जगण्याची २० टक्के शक्‍यता वर्तवली. त्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता पूर्णपणे संपलेली होती. कोल्हापुरातून मृतदेह कोकणात आणला. कोल्हापुरातील डॉक्‍टरांनी सांगितले की, मृतदेह पूर्ण पॅक करून व आवश्‍यक काळजी घेऊन ताब्यात देत आहोत. त्यामुळे त्याचे तुम्ही विधिपूर्वक उत्तरकार्य करू शकता. स्वाईन फ्लूचा संसर्ग हा फुफ्फुसात झाल्यामुळे बाकी कुणाला त्याचा त्रास होण्याची आता शक्‍यता नाही.

देवरुखात मृतदेह आला तेव्हा सुमारे २०० ते ३०० लोक जमले होते. स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञांनीही त्याच्यापासून संसर्ग होईल, अंत्यदर्शन दूरवरून घ्या, असे सांगितले. मृतदेह जोशींच्या घरात न्यायलाही सर्वांनी प्रतिबंध केला. मी स्वत: मृतदेहासह वातानुकूलित गाडीतून ३ तास प्रवास केला. मात्र, देवरुखातील गैरसमजुतीमुळे मृतदेह उचलण्यास कोणी पुढे आले नाही.

आम्ही कोल्हापूरहून आलेले दोघे ॲब्युलन्सचा ड्रायव्हर व देवरुखातील दोघे पत्रकार मित्र यांनीच मृतदेह उचलला. बाकीचे लोक ५० फुटांवरून हे सर्व पाहत होते. स्वाईन फ्लूबाबत असे गैरसमज समाजाला घातक आहेत, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.