रत्नागिरी, लांजा आगाराच्या एसटीची वाहतूक ठप्प

bus-stand
bus-stand

रत्नागिरी - जिल्ह्यात रत्नागिरी व लांजा वगळून सर्व आगारांमध्ये एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी शहरी व ग्रामीण वाहतुकीच्या फेर्‍या धिम्या गतीने सुरू होत्या. तसेच लांज्यामध्ये वाहतूक बर्‍यापैकी चालू होती. मात्र उर्वरित मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरुख, संगमेश्‍वर व राजापूर तालुक्यांतील वाहतूक ठप्प झाली.

एसटी अधिकार्‍यांना अघोषित संपाची कल्पना असल्यामुळे कालपासूनच त्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. पोलिस अधिकार्‍यांनीही एसटीच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन संपाची स्थिती जाणून घेतली. एसटी बंद असल्याने शहरात रिक्षा व महामार्गावर वडाप वाहतूकदारांचे फावले.

काल मध्यरात्रीपासून एसटी कामगारांनी अघोषित संप पुकारला आहे. संपाची कोणतीही माहिती नसल्याने आज सकाळी एसटी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली. परंतु संपामुळे गाड्या सुटल्या नाहीत आणि प्रवासी घरी परतले. काही जण पर्यायी व्यवस्थेने आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचले.

रत्नागिरी एसटी विभागातील सुमारे चार हजार चालक, वाहक, कारागिर या संपात सहभागी झाले आहेत. फक्त प्रशासकीय कर्मचारी, लिपिक आणि अधिकारी कामावर हजर आहेत. रत्नागिरी एसटी विभागात दिवसभरात सुमारे नऊ हजार फेर्‍या सुटतात. त्यापैकी 1000 ते 1200 फेर्‍या सुटतील, असा प्राथमिक अंदाज एसटी अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सुदैवाने शाळा, कॉलेज अजून सुरू झालेल्या नसल्याने आज विद्यार्थ्यांचे हाल झाले नाहीत. मात्र बाजारात शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी, पालक येऊ लागले आहेत. त्यांना मात्र बंदचा फटका बसला आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह अन्य सर्व संघटनांचे सदस्य संपात सहभागी झाले. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने या बंदला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या संघटनेचे सभासद कामावर हजर होणार असून वाहतूक चालू ठेवणार असल्याचे म्हटले आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगारांना एवढी वेतनवाढ देऊनही कामगारांनी बंद पाळणे गंभीर आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल न करता कामगारांनी हजर व्हावे, असे आवाहन कामगार सेनेने केले आहे. 

वृत्तपत्रांची पार्सले रखडली
अघोषित बंदमुळे पहाटे 4 वाजल्यापासून वृत्तपत्रांची पार्सले गावोगावी पोहोचू शकली नाहीत. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था, दुचाकीद्वारे पार्सले पोहोचवण्यात आली. मात्र बर्‍याच ठिकाणी पार्सल पोहोचण्यास उशिर झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com