रत्नागिरी एमआयडीसीतील मोठ्या कंपनीवर प्राप्तिकर विभागाचा छापा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

रत्नागिरी - येथील औद्योगिक वसाहतीमधील नव्याने विस्तारीकरण झालेल्या कंपनीवर प्राप्तिकर विभागाच्या मुंबई कार्यालयातील पथकाने आज छापा टाकला. सकाळी दहापासून सायंकाळी साडेपाचपर्यंत कारवाई सुरू होती. पथकात सुमारे पाच वरिष्ठ अधिकारी होते. कंपनीच्या व्यवस्थापकाने मात्र हे अधिकारी नसून आमचे पाहुणे असल्याचे सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र प्राप्तिकर कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

येथील औद्योगिक वसाहतीत काही वर्षांपूर्वीच एका कंपनीचा विस्तार झाला आहे. त्यांचे एक नव्हे, तर जवळ-जवळ दोन प्लॅंट आहेत. यापूर्वी त्या कंपनीतून कच्च्या मालाची चोरी झाल्याचीही घटना उघड झाली आहे. या कंपनीवर आज सकाळी दहा वाजता प्राप्तिकर विभागाचा छापा पडला. अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यवस्थापकासह सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी भांबावून गेले. प्राप्तिकर पथकाने तत्काळ सर्वांचे मोबाइल ताब्यात घेतले. पथकाने संपूर्ण कारवाईमध्ये कमालीची गुप्तता बाळगली; मात्र सायंकाळपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कारवाईबाबत माहिती घेतली असता संबंधित कंपनीकडून त्याला दुजोरा मिळाला. 

प्राप्तिकर विभागाकडून कंपनीची सुमारे आठ तास चौकशी सुरू होती. विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे समजते. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. सायंकाळी उशिरा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वृत्तपत्रांचे प्रतिनिधी कंपनीत गेले होते; मात्र काही वेळातच कंपनीतून पथक बाहेर पडले. या पथकाने बातमीदारांशी संवाद साधला नाही. पोलिसांकडे याची चौकशी केली असता, मुंबईतून प्राप्तिकर अधिकाऱ्यांचे पथक आल्याचे सांगण्यात आले. 

कारवाईसाठी पथक नव्हे, पाहुणे 
कारवाई संपल्यानंतर प्राप्तिकर विभागाचे पथक बाहेर पडले. तेवढ्यात तेथे कंपनीचे व्यवस्थापक आले. पत्रकारांनी कंपनीची बाजू घेण्यासाठी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ""तुम्हाला कोणी सांगितले, तुमचा गैरसमज झाला आहे. कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. जे अधिकारी गेले, ते आमचे गेस्ट होते.'' यानंतर पत्रकारांनी आक्रमक होत पोलिसांनी याला पुष्टी दिल्याचे सांगितल्यावर मॅनेजरचा आवाज खाली आला.