रत्नागिरीतून थेट युरोपमध्ये हापूस पाठविण्याचा मार्ग मोकळा

रत्नागिरीतून थेट युरोपमध्ये हापूस पाठविण्याचा मार्ग मोकळा

रत्नागिरी - बुधवारी (ता. 25) सायंकाळी एनपीपीओकडून उष्णजल प्रक्रियेला हिरवा कंदिल मिळाल्याचे सर्टिफिकेट प्रकिया केंद्राला प्राप्त झाल्यानंतर रत्नागिरीतून थेट युरोपमध्ये हापूस पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला. यंत्रणा असूनही 2015 पासून आंबा थेट युरोपला पाठविण्यात तांत्रिक अडथळे निर्माण होत होते. गुरुवारी (ता. 26) सकाळी साडेचारशे डझन आंबा उष्णजल प्रक्रियेद्वारे युरोपवारीसाठी मुंबईत पाठविण्यात आला. तेथून तो हवाईमार्गे इंग्लंडला रवाना होणार आहे.

आठवडाभरापूर्वी फरिदाबाद येथील राष्ट्रीय पीक संरक्षण संघटना (एनपीपीओ), अपेडा यांच्या पथकाने रत्नागिरीतील आंबा प्रक्रिया केंद्राची तपासणी केली. त्यानंतर तेथील अधिकारी रजेवर असल्यामुळे सर्टिफिकेट पाठविण्यात उशीर झाला होता. रत्नागिरीतील काही बागायतदार आणि निर्यातदार सज्ज होते; परंतु परवानाच नसल्याने त्यांना उशीर होत होता. त्यासाठी वाशीचा पर्याय उपलब्ध होता.

पण रत्नागिरीतून वाशीत आंबा पाठविण्यासाठी बागायतदार तयार नव्हते. रत्नागिरीतील पणन अधिकार्‍यांनी बागायतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी थेट एनपीपीओच्या अधिकार्‍यांकडे पाठपुरावा करुन ते सर्टिफिकेट तत्काळ मिळविण्यासाठी धडपड केली. त्याला काल यश आले. सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर लगेचच पहिली कन्साईनमेंट रत्नागिरीतून रवानाही झाली. मँगोनेटवरील नोंदणीकृत रत्नागिरीतील बागायतदार समीर दामले यांच्या बागेतील साडेचारशे डझन आंबा युरोपवारीला रवाना झाला. आज सकाळी रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रात उष्णजल प्रक्रियेसाठी दाखल झाला.

अशी झाली प्रक्रिया

रत्नागिरी प्रक्रिया केंद्र पणनकडून सद्गुरु एंटरप्रायझेसला चालविण्यास दिले आहे. सुरुवातीला आंबा नियमित तपमानाला (30 अंश सेल्सिअस) वातानुकूलित खोलीत ठेवला जातो. युरोपच्या निकषानूसार 48 अंश सेल्सिअसला 60 मिनीटांची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर वॉशिंग, ब्रशिंग करून तो व्यवस्थित स्वच्छ करुन घेण्यात आला. परदेशी निर्यातीसाठी कव्हरमध्ये टाकून तो एक डझनच्या बॉक्समध्ये भरण्यात आला. त्यानंतर कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकार्‍यांकडून फायटो तपासणी केली गेली. दाखला मिळाल्यानंतर बॉक्स सीलबंद कंटेनरमधून सायंकाळी मुुंबईला रवाना झाले. उद्या सकाळी 7 वाजताच्या विमानाने इंग्लंडला आंबा रवाना होणार आहे.

प्रक्रियेसाठी साडेसाळा रुपये प्रतिकिलो खर्च

उष्णजल प्रक्रियेसाठी एका किलोला 8 रुपये 50 पैसे खर्च येतो. त्यानंतर वॉशिंग, ब्रशिंग आणि अन्य प्रक्रियेसाठी प्रतिकिलो 7 रुपये घेतले जातात. आंबा प्रक्रिया केंद्रात उतरविणे आणि पुन्हा भरणे यासाठी प्रतिकिलो 1 रुपया खर्च येतो. आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी प्रक्रिया केंद्रात एका किलोला 16 रुपये 50 पैसे खर्च अपेक्षित आहे.

उष्णजलमध्ये असलेले साहित्य

प्रक्रिया केंद्रात उष्णजल प्रक्रियेचे साहित्य 2015 ला खरेदी करण्यात आले होते. त्यावेळी सुमारे तीन लाखाहून अधिक खर्च पणनला आला होता. एकावेळी 960 किलो आंब्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन टँक आहेत. एका टँकची क्षमता 720 किलो आणि दुसर्‍याची 240 किलो आहे. पाण्यात ठेवलेल्या आंब्याचे तपमान संगणकावर दर्शविले जाते. ते नोंदविण्यासाठी आठ सेंन्सर टँकमध्ये उपलब्ध आहेत. त्याद्वारे पाण्याचे तपमान निश्‍चित केले जाते.

वाशीची आवश्यकता नाही

बागायतदारांना आंबा रत्नागिरी प्रक्रिया केंद्रात वॉशिंग करुन तो उष्णजलसाठी वाशीमध्ये पाठवावा लागत होता. यामध्ये आंबा तीन वेगवेगळ्या ठिकाणी लोडिंग, अनलोडिंगसाठी हाताळावा लागत होता. आता फक्त दोनच वेळा हाताळावा लागेल. रत्नागिरी हापूस संवदनशील असल्याने बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. तसेच खर्चही कमी होणार असल्याचे बागायतदारांनी सांगितले.

युरोपला आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आंबा प्रक्रिया केंद्रात दाखल झाला. त्यावर प्रक्रियाकरुन तो पुढे मुंबईतून हवाई वाहतूकीने युरोपला रवाना होईल.

- विश्‍वपाल मोरे, व्यवस्थापक

रशियाला 1200 किलो आंबा रवाना

युरोपबरोबर रशियाला 1200 किलो आंबा थेट रत्नागिरीतून पाठविण्यात आला आहे. रशियातून मेडिटेशिअन फळमाशीचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी उष्णजल प्रक्रिया आवश्यक केली आहे. उष्णजल प्रक्रियेमुळे रशियालाही आंबा थेट जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com