फणसवणेतील कुटुंबाचा घरासाठी एकतप संघर्ष

संदेश सप्रे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

देवरूख -  १५ वर्षांपूर्वी घर मंजूर झाले तेव्हा जागा नव्हती आणि आता जागा मिळाली पण घर मंजूर होत नाही. त्यामुळे कुणी घर देता का घर हा नटसम्राट मधील डायलॉग वास्तवात म्हणण्याची वेळ फणसवणे गावातील सुभाष धोंडू साबळे यांच्यावर आली आहे.

देवरूख -  १५ वर्षांपूर्वी घर मंजूर झाले तेव्हा जागा नव्हती आणि आता जागा मिळाली पण घर मंजूर होत नाही. त्यामुळे कुणी घर देता का घर हा नटसम्राट मधील डायलॉग वास्तवात म्हणण्याची वेळ फणसवणे गावातील सुभाष धोंडू साबळे यांच्यावर आली आहे.

संगमेश्वर तालुक्‍यातील फणसवणे गावात ३५ वर्षापासून वास्तव्यास असलेले भाऊ धोंडू साबळे व सुभाष धोंडू साबळे हे दोघे बंधु मासेमारीवर उदरनिर्वाह करतात. हे दोघेही भटक्‍या जमातीमधील असल्याने त्यांच्या मूळ गावाचा पत्ता नाही. बरीच वर्षे गावात वास्तव्यास असल्याने या दोघांना २००२ मधे इंदिरा आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. मात्र हक्काची जागा नावावर नसल्याने त्यांचे घरकुल मिळू शकले नाही.

यातील सुभाष यांची जागेची अडचण समजताच गावातील प्रमुख मानकरी प्रभाकर विचारे यांनी आपल्या मालकीची ११ गुंठा जागा प्राथमिक शाळेला व तीन गुंठा जागा या घोरपी समाजाच्या कुटुंबाला विनामोबदला दिली होती. जागा मिळाल्यावर २००७ मधे पुन्हा या बंधूंना हक्काचे घर मिळावे म्हणून ग्रामपंचायत फणसवणे मार्फत प्रस्ताव करण्यात आला. त्यापैकी २०१२ मध्ये भाऊ साबळे या मोठ्या भावाला घरकुल मिळाले. मात्र एकाच वेळी दोघांचा प्रस्ताव असताना सुभाषचे कुटुंब आजही घराच्या प्रतीक्षेत आहे.

गावातील इतराना घरे असतानाही घरकुल मिळाली पण हे कुटुंब भटक्‍यासमाजाचे बेघर असूनही आजही त्यांना आपल्या कुटुंबाला घेऊन ऊन पावसात प्लास्टिक कागदाच्या झोपडीत संसार करावा लागत आहे. आता शासनाच्या नवीन धोरणानुसार ज्यांची घरे मातीची आहेत, जे अंपग आहेत, ज्या महिला विधवा आहेत, जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल आहेत, जे बेघर आहेत अशा सर्वांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्या मधे भटक्‍या जमातीला विशेष प्राधान्य न दिल्याने या सर्वाबरोबर आमचा नंबर केव्हा लागणार, असा सवाल साबळे यांनी विचारला आहे.

ऊन असो वा पाऊस साबळे कुटुंब कच्च्या घरात दिवस काढत आहे. पावसात घरात पाणी शिरते म्हणून ओलावर झोपायचे तर अन्यवेळी सरपटणारे प्राणी घरात येतील त्या भीतीने रात्र काढायची अशा स्थितीत हे कुटुंबीय आला दिवस ढकलत आहेत.

हक्काचे घर मिळावे यासाठी गेले १२ वर्षे झगडत आहे मात्र न्याय मिळत नाही. आमचा असा काय गुन्हा आहे तो प्रशासनाने सांगावा नाहीतर आम्हाला घर द्यावे. 
- सुभाष साबळे