मिरकरवाडा बंदरात पाच दिवसांत काढला २४०० क्‍यूबिक मीटर गाळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी - येथील मिरकरवाडा बंदरातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मागील पाच दिवसांमध्ये २४०० क्‍यूबिक मीटर गाळ फ्लोटिंग ड्रेझरद्वारे काढण्यात आला. हा गाळ किनाऱ्यावर न टाकता बार्जद्वारे खोल समुद्रात टाकण्यात येतो. त्यासाठी हायड्रोग्राफिक सर्व्हेमध्ये समुद्रातील जागा निश्‍चित केली असल्याचे मेरीटाईम बोर्डाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी - येथील मिरकरवाडा बंदरातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मागील पाच दिवसांमध्ये २४०० क्‍यूबिक मीटर गाळ फ्लोटिंग ड्रेझरद्वारे काढण्यात आला. हा गाळ किनाऱ्यावर न टाकता बार्जद्वारे खोल समुद्रात टाकण्यात येतो. त्यासाठी हायड्रोग्राफिक सर्व्हेमध्ये समुद्रातील जागा निश्‍चित केली असल्याचे मेरीटाईम बोर्डाकडून सांगण्यात आले.

मिरकरवाडा हे कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक बंदर म्हणून ओळखले जाते. बंदर विकास कार्यक्रमांतर्गत टप्पा दोनमधून ७१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या बंदरात गाळ येऊ नये यासाठी दोन ब्रेकवॉटरवॉल उभारण्यात आल्या आहेत. हायड्रोग्राफिक सर्वेनुसार येथे दोन लाख ८७ क्‍यूबिक मीटर गाळ बंदरात साचलेला आहे. गेली अनेक वर्षे साचलेला हा गाळ काढण्यासाठी फ्लोटिंग ड्रेझर मागविण्यात आला आहे. ५ नोव्हेंबरला त्याद्वारे काम सुरू झाले आहे. गाळ काढल्यानंतर बार्जद्वारे तो खोल समुद्रात टाकला जातो.

एका बार्जमध्ये सहाशे क्‍यूबिक मीटर गाळ राहू शकतो; परंतु तो बार्ज पूर्ण भरला जात नाही. तसेच गाळ काढण्यासाठी साडेतीनशे एचपीच्या एक्‍सेव्हेटरचा उपयोग केला जात आहे. काम सुरू केल्यानंतर पाच दिवसांत २४०० क्‍यूबिक मीटर गाळ काढण्यात यश आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बंदरातील गाळाची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. सध्या मुख्य चॅनल मोकळे केले जात आहे. हे काम करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल असे एमएमबीकडून सांगण्यात आले. चॅनल मोकळे केल्यानंतर प्रत्यक्ष जेटीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले जाईल.

त्यासाठी सक्‍शन ड्रेझर मागविण्यात येणार आहे. मुंबईतून हा ड्रेझर निघाला असल्याचे एमएमबीने सांगितले. जेटीच्या ठिकाणी फ्लोटिंग ड्रेझरचा उपयोग होणार नाही. चार जेटींपैकी शेवटच्या दोन जेटी पूर्णतः गाळाने भरलेल्या आहेत. तेथील गाळ हा गवत आणि नौकांमधील डिझेल पडून खराब झाला आहे. तो गाळ काढताना कंत्राटदाराला समस्येला सामोरे जावे लागत आहे.

गाळ रोखण्यासाठी उपाय
बंदरातील गाळ रोखण्यासाठी मशिदीजवळील संरक्षक भिंतीची लांबी १५० मीटरने वाढविली. तसेच पाण्याचे प्रवाह मिरकरवाड्यात येऊ नयेत यासाठी पांढरा समुद्राजवळ ६७५ मीटरचा नवीन बंधारा बांधला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून सुमारे ५२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

‘मिरकरवाडा बंदरातून बाहेर पडणाऱ्या चॅनेलमधील खोली ओहोटीच्यावेळी दहा फूट असेल, तर नौका सहजपणे बाहेर पडतील. गाळामुळे सध्या पाच फूटच खोली शिल्लक आहे. नौका मच्छी भरून आल्या तर तळ वाळूला घासतो. त्यामुळे नौकांचे नुकसान होते.
- सिराज वाडकर, मच्छीमार