रिफायनरीविरोधात राजापुरात एल्गार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

राजापूर - तालुक्‍यातील सागवे येथील भूमिकन्या एकता मंचच्या नेतृत्वाखाली नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाविरोधात तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. यामध्ये महिलांसह लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चेकऱ्यांनी कोणत्याही स्थितीमध्ये प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. ‘कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय जाणार नाय’, ‘आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर, मोदी सरकार जमीन चोर’, अशा घोषणांनी राजापूर परिसर दणाणून गेला. 

राजीव गांधी क्रीडांगण ते तहसील कार्यालय, असा मोर्चा काढला. हजारो मोर्चेकऱ्यांनी तीन तास पायी प्रवास करीत तहसील कार्यालयावर धडक दिली. मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्तांसोबत शेतकरी, मच्छीमार समितीचे अध्यक्ष ओंकार प्रभुदेसाई, कमलाकर कदम, भाई सामंत, आमदार हुस्नबानू खलिफे, अविनाश लाड, अशोक वालम, रवींद्र नागरेकर, ॲड. जमीर खलिफे, राजू पवार, चंद्रकांत बावकर, भास्कर कुवळेकर आदी सहभागी झाले होते.

मोर्चामध्ये नरेंद्र मोदी- अमित शहा यांनी विकासाच्या नावाखाली कोकण परिसर सौदी अरेबियाला विकल्याच्या चित्रांचा बॅनर लक्षवेधी ठरत होता. डफ आणि तुणतुण्यासह नाणार परिसरातील लोकशाहीर मोर्चामध्ये सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्त चौदा गावांव्यतिरिक्त तालुक्‍यातील अन्य गावातील ग्रामस्थांनीही मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. सागवेच्या भूमिकन्या एकता मंचच्या महिलांनी प्रांताधिकारी अभय करंगुटकर आणि तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन दिले. रिफायनरी रद्द न झाल्यास प्रकल्पविरोधाची धार अधिक तीव्र करण्याचा इशारा निवेदनातून दिला. 

शिवसेनेच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा
मोर्चामध्ये काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, शिवसेनेचे खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती दिसत होती. मोर्चामध्ये सेनेची असलेली अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती.

Web Title: Ratnagiri News agitation against Nanar Project in Rajapur