कमी पडणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला करा - पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

रत्नागिरी - राष्ट्रवादी वाढविण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने मिळालेल्या पदाचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी दर दोन महिन्यांनी बैठका घेऊन आढावा घ्यावा, त्याची नोंद ठेवा. कामात कमी पडत असतील त्यांना बाजूला करा, अशा कडक सूचना राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

रत्नागिरी - राष्ट्रवादी वाढविण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने मिळालेल्या पदाचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी दर दोन महिन्यांनी बैठका घेऊन आढावा घ्यावा, त्याची नोंद ठेवा. कामात कमी पडत असतील त्यांना बाजूला करा, अशा कडक सूचना राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

येथील केतन मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या समर संवाद मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यातील फादर संघटना, विद्यार्थी आणि महिला सेलचे काम चांगले सुरू आहे. युवकसह सामाजिक न्याय सेलकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. काम करणाऱ्या कायकर्त्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहिले पाहिजे. मिळालेले पद कायमस्वरूपी राहणार नाही. जुन्या-नव्यांचा वाद न करता दापोली, गुहागरमध्ये आमदार निवडून आले. त्याचप्रमाणे जिल्हा राष्ट्रवादीमय करू. शेखर निकम मध्येच ढेपाळतात. त्यांनी आक्रमक बनले तरच त्यांचा निभाव लागेल.

पक्षसंघटना मजबुतीसाठी हा दौरा आहे. प्रत्येकाने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून काम करा. दक्षिण पट्ट्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करूया. काम करण्याची जिद्द असेल, तरच संघटना वाढेल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी अडचणी मांडल्या. चित्रा चव्हाण यांनी तर थेट पक्षांतर्गत वादाचे उल्लेख करून ते संपविण्याची मागणी केली. शौकत मुकादम यांनी चिपळुणातील निर्णय त्यांना विचारून घेतले जावेत असे सुनावले. संजय कदम यांचेही  भाषण झाले.

खडे बोल सुनावणारे कोकणातच
भास्कर जाधव यांनी नेत्यांच्या चुकांवर बोट ठेवले. सुनील तटकरेंनी त्यावर मार्मिक उत्तर दिले. दोघांच्या चकमकीवर बोलताना अजिदादा म्हणाले की, कोकणी माणसे खडे बोल सुनवायला कधीच कमी पडत नाहीत. ते आक्रमक बोलायला लागले की आम्ही गप्प बसून ऐकतो. त्याशिवाय पर्याय नसतो.

निकमनी राजीनामा पाठवू नये
निवडणुकीत पराभव झाला की शेखर निकम जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पाठवतात. यापुढे त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही. भविष्यात त्यांनी तो पाठवू नये, असे तटकरेंनी सुनावले.