रंगमंचावर विठू सावळा साकारताना वारीचा अनुभव

मकरंद पटवर्धन
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - ‘‘रंगमंचावर येण्यापूर्वी पोटात भीतीचा गोळा असतो; पण रंगमंचावर आल्यानंतर मातीच्या गोळ्यातून ‘विठू सावळा’ साकारतो. आम्ही सर्व कलाकार विठ्ठलमय होऊन जातो. प्रत्यक्ष वारीला कधी गेलो नाही; पण दोन तासांत वारीला जाऊन पांडुरंगाने प्रत्यक्ष दर्शन दिल्याचा आनंद मूर्ती घडवताना मिळतो, तोही रंगमंचावर...’’ हरहुन्नरी कलाकार श्रीकांत ढालकर सांगत होते.

रत्नागिरी - ‘‘रंगमंचावर येण्यापूर्वी पोटात भीतीचा गोळा असतो; पण रंगमंचावर आल्यानंतर मातीच्या गोळ्यातून ‘विठू सावळा’ साकारतो. आम्ही सर्व कलाकार विठ्ठलमय होऊन जातो. प्रत्यक्ष वारीला कधी गेलो नाही; पण दोन तासांत वारीला जाऊन पांडुरंगाने प्रत्यक्ष दर्शन दिल्याचा आनंद मूर्ती घडवताना मिळतो, तोही रंगमंचावर...’’ हरहुन्नरी कलाकार श्रीकांत ढालकर सांगत होते.

श्री. ढालकर हे रत्नागिरीचे सुपुत्र, कलाकार. ते चित्रकार, गायक, शिल्पकार व अभिनेते असे त्यांचे चतुरस्र व्यक्तिमत्त्व. या साऱ्याला न्याय देणारी भूमिका त्यांना मिळाली. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ या नाटकामध्ये रंगमंचावर विठूरायाची मूर्ती साकारण्याची संधी ढालकर यांना मिळाली आहे. या नाटकाचे मुंबई परिसरात २५ हून अधिक प्रयोग झाले आहेत. सुरवातीपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या नाटकासंदर्भातील अनुभव ढालकर यांनी सांगितले.

या नाटकात पडदा उघडल्यानंतर दिंडी दिसते. वारकऱ्याच्या रूपातील ढालकर प्रेक्षकांना अभिवादन करीत नाटकाच्या पहिल्याच गाण्यावर थिरकत मातीला आकार देण्यास सुरवात करतात. प्रत्यक्षातील संवाद चालू असतानाही ते शांतपणे व काही दृश्‍यात गाणी, नृत्य चालू असताना बेभान होऊन नाचत पांडुरंगाची मूर्ती घडवीत असतात. पहिला अंक संपण्यापूर्वी मूर्ती पूर्ण होते व दुसऱ्या अंकात सकाळच्या दृश्‍यात ते मूर्तीवर अखेरचा हात फिरवून रंग भरतात. ज्या वारकऱ्याला विठूरायाच्या पूजेचा पहिला मान मिळतो, त्याच्या हस्तेच या मूर्तीचे पूजन होते. तेव्हा ढालकर प्रेक्षकांना अभिवादन करतात व रसिक टाळ्यांचा कडकडाट करतात. ९० मिनिटांत मूर्ती रंगासह पूर्ण होते. हा अनुभव विलक्षण असल्याचे ढालकर म्हणाले.

अभिनेता भरत जाधव, संतोष पवार, नंदेश उमप, आनंद शिंदे आदी कलाकारांनी या नाटकाला दाद दिल्याचे ढालकर यांनी सांगितले. या नाटकाचे लेखन युवराज पाटील व डॉ. संदीप माने, दिग्दर्शन डॉ. संदीप माने, संकल्पना व नृत्य दिग्दर्शन सचिन गजमल यांनी केले आहे. सरस्वती थिएटर प्रकाशित जॉय कलामंच निर्मित या नाटकाचा कोकण दौराही होणार आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, बोरीवलीसह अनेक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग हाउसफुल्ल झाले आहेत. यापूर्वी ‘झी मराठी’ हास्यसम्राट व ‘मराठी पाऊल पडते पुढे’ मध्ये कला सादर केल्यानंतर या नाटकाचा आगळा अनुभव सध्या आपण घेत असल्याचे ढालकर  यांनी सांगितले.