भातगाव-करजुवे खाडीतील बोट वाहतूक सुरू 

संदेश सप्रे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

देवरूख - बंदर विभागाच्या आदेशानुसार भातगाव-करजुवे खाडीतील बोटीद्वारे होणारी प्रवासी वाहतूक आजपासून पुन्हा पूर्ववत झाली. सेवा बंद झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे होणारे हाल "सकाळ'ने बातमीद्वारे मांडले होते. यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा होईपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्यास सहकार्य करण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले. वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने या भागातील ग्रामस्थांनी "सकाळ'चे विशेष आभार मानले आहेत. 

भातगाव-करजुवे खाडीत भातगाव येथील प्रकाश सीताराम महाकाळ यांची "रुक्‍मिणी प्रसाद' ही प्रवासी वाहतूक करणारी बोट कार्यरत आहे. या बोटीची 16 जानेवारी 2017 ला बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. त्यावेळी नौकेवर वैध प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. जोपर्यंत नौकेचे सर्वेक्षण होऊन वैध सर्वेक्षण प्रमाणपत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत ही सेवा बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या जयगड बंदरातील बंदर निरीक्षक यांनी एका नोटीशीद्वारे दिले होते. त्यानंतर ही सेवा बंद करण्यात आली होती.

यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे होणारे हाल "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. यानंतर स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि लोकप्रतिनिधींनी सोमवारी (ता.12) रत्नागिरीत बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत वस्तुस्थिती कथन केली. यामध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला जायचे असेल तर होडीशिवाय पर्याय नाही, रस्त्याने जायचे असेल तर 100 किमीचा वळसा पडणार आहे.

हे विद्यार्थ्यांसह पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे जोपर्यंत परीक्षेपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याची विनवणी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केली. त्याचप्रमाणे बोटचालकानेही वैध सर्व्हे प्रमाणपत्रासाठी आवश्‍यक कागदपत्र लवकरात लवकर पूर्ण करू अशी ग्वाही दिली. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी परीक्षा होईपर्यंत या सेवेला तोंडी मुभा दिली आहे. यामुळे आजपासून या बोटीतून पुन्हा विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या भातगाव, कोसबी आदी ठिकाणाहून दहावी, बारावीसह इतर इयत्तेत शिकणारे 60 विद्यार्थी करजुवे, माखजन, सावर्डे असा प्रवास करतात. 

संबंधीत बातम्या - 

Web Title: Ratnagiri News Bhatgaon - Karjuve Khadi Boat service start