पूर्णगड खाडीकिनारी मिळाली बंपर मासळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी/पावस - रायगडपाठोपाठ पूर्णगड (ता. रत्नागिरी) खाडीत काल (ता. ३) रात्री अचानक किनारी भागात विविध प्रकारचे भरमसाट जिवंत मासे सापडू लागले. ते पकडण्यासाठी खाडीकिनारी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

रत्नागिरी/पावस - रायगडपाठोपाठ पूर्णगड (ता. रत्नागिरी) खाडीत काल (ता. ३) रात्री अचानक किनारी भागात विविध प्रकारचे भरमसाट जिवंत मासे सापडू लागले. ते पकडण्यासाठी खाडीकिनारी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. काहींनी तर जाळी घेऊन मच्छीमारी बोटी खाडीत सोडल्या. भल्या मोठ्या खेकड्यांसह छोटे मासे जाळ्यात सापडत होते; मात्र अचानक झालेल्या बदलांमुळे सारेच अचंबित झाले होते. कुणी म्हणत होते हा निसर्गाचा प्रकोप, तर काहींनी हवामान बदलाचा हा परिणाम असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या.

मासे मिळविण्यासाठी मच्छीमारांना खोल समुद्रात जावे लागते. यावर्षी अचंबित करणाऱ्या घटना कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनला किनारी भागात जिवंत मासे मोठ्या प्रमाणावर आढळून आले. ते पकडण्यासाठी एकच गडबड उडाली. तो प्रकार ताजा असतानाच रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड किनारी काल रात्री अशीच घटना घडली. बत्तीच्या उजेडावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या पूर्णगडवासीयांना मोठ्या प्रमाणात मासळी जाळ्यात सापडत असल्याचे दिसून आले. ही गोष्ट ग्रामस्थांच्या कानावर आल्यानंतर सर्वांनी किनारी भागात धाव घेतली.

खेकडे, बोयर, रेणव्या, पालू यासारखी मासळी किनाऱ्यावर झेप घेत होती. ती पकडण्यासाठी ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडाली. काही मच्छीमारांनी होड्या खाडीत नेल्या. रात्री १२ वाजल्यानंतर हा प्रकार घडला होता. अनेक नागरिकांनी ताजे मासे पकडून घरी जाऊन त्यावर ताव मारला. याबाबत ग्रामस्थ संतोष पाथरे म्हणाले की, एकाचवेळी असे वेगवेगळे मासे मिळण्याचा प्रकार प्रथमच पाहायला मिळाला. हा प्रदूषणाचा परिणाम असता तर मृत मासे किनारी लागले असते; परंतु पाण्यातील अंतर्गत प्रवाहांच्या बदलामुळे हे मासे किनारी भागात आले असावेत. हे बदल सुनामी येण्याची शक्‍यता असू शकते. त्यामुळेच माशांनी किनारी भागाकडे मार्ग वळविला असावा, असा एक अशास्त्रीय परंतु अनुभवांवर आधारित अंदाज बांधला जात आहे.

बदलते प्रवाह, वाऱ्यांची दिशा आणि किनारी भागात माशांना पूरक खाद्यान्नाची उपलब्धता हे घडून आल्यामुळे अशाप्रकारे किनारी भागात मोठ्या प्रमाणात मासळी सापडू शकते. अन्य कोणत्याही चर्चांना वैज्ञानिक आधार नाही.
- डॉ. स्वप्नजा मोहिते, अभ्यासक