हर्णै बंदरामध्ये "द बर्निंग बोट" चा थरार; दोन खलाशी बेपत्ता

हर्णै बंदरामध्ये "द बर्निंग बोट" चा थरार; दोन खलाशी बेपत्ता

हर्णै - दापोली तालुक्यातील हर्णै बंदरामध्ये एका मासेमारी नौकेला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या नौकेमध्ये असणाऱ्या चार खलाशांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून दोन खलाशी अजूनही बेपत्ताच आहेत. दापोली पोलीस तसेच कोस्टगार्ड यंत्रणा त्यांचा कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार रफीक झकरिया मुकादम (रा.नावखोल, राजीवडा रत्नागिरी) एका मित्राच्या सांगण्यावरून भाडे करारावर" एकविरा" नावाची एक पर्ससिननेट मासेमारी नौका ५ ते ६ दिवसांपूर्वी चालवायला घेतली. त्यानंतर जयगड येथे आणून तिची डागडुजी करून मगच पुढच्या मासळी हंगामासाठी वापरायची असे ठरवून स्वतः रफिक मुकादम (४५), मेहबूब मोईद्दीन सय्यद (३९) रा.- मासलगाव; जि.- बीड, हानिफ कुरेशी(४५) रा.- वडाळा(ई.) मुंबई हे सर्व खलाशी व तांडेल म्हणून आरिफ (वय - ५५) यांना घेऊन मुंबईहून जयगड येथे आणत होते ते मंगळवारी (ता. १५) सकाळी नऊच्या सुमारास भाऊच्या धक्क्यावरून ४०० लिटर डिझेलचा साठा घेऊन निघाले.

रफिक यांनी सांगितले की आम्ही तांडेल आरिफ याला श्रीवर्धनला थांबायला सांगत होतो परंतु ते थांबलेच नाहीत ते दाभोळ येथे येऊन थांबणार होते आणि येता येता हर्णै बंदरामध्ये आंजर्ले खाडीसमोर बोटीला आग लागली इंजिनच्या बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टॅन्कमधील पाणी संपले आणि इंजिन तापून ठिणगी उडल्यामुळे आग लागली. तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या हर्णै बंदरातील मासेमारी नौकांना वाचवण्यासाठी ओरडू लागलो. त्यावेळी हर्णै बंदरातल्या दोन नौका आम्हाला तेथे वाचवायला आल्या. त्यावेळी आम्ही पटापट सर्वांनी पाण्यामध्ये उड्या घेतल्या परंतु मला आणि महामुद सय्यद याला वाचवण्यात यश आले. पण हानिफ कुरेशी याला पोहता येत नव्हते. त्यामुळे त्याला नौकेमध्ये घेण्यासाठी म्हणून या मच्छीमार बांधवानी मोठा दोरखंड फेकला परंतु लाटांच्या तडाख्यामुळे त्याला दोर पकडता आला नाही. तो तिथेच बुडाला तसेच तांडेल आरिफ हा पाण्याचा वेग आणि लाटांच्या तडाख्यामुळे पोहत पोहत भरकटला. त्यामुळे तोदेखील आम्हाला सापडला नाही.  

काल रात्री आठच्या सुमारास समुद्रात ही घटना घडली. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मोठा स्फोट झाला घडणारा प्रकार हर्णै पाजपंढरी किनारपट्टीवरून स्पष्ट दिसत होता. त्यामुळे हर्णै पाजपंढरी परिसरातील मच्छीमारबांधव प्रचंड घाबरून गेले. 'आग लागली , आग लागली म्हणून जो तो हर्णै बंदराकडे धाव घेऊ लागला. बहुतांशी ग्रामस्थ हे हर्णै बंदरावर धक्यावर एकत्र आले. कारण कोणाच्या बोटीला आग लागली आहे, हे कळत नव्हते. ताबडतोब काही छोट्या बोटी घटनास्थळी धावल्या आणि त्या बचावलेल्या खलाशांना घेऊन आल्या. तेंव्हा ही नौका मुंबईची असून ती जयगडला जात असल्याची शहानिशा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com