कॅनिंग दराचाही बागायतदारांना फटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

रत्नागिरी - मे महिन्याच्या सुरवातीला पडलेला पाऊस आणि कडकडीत उन्हामुळे वीस टक्‍के हापूसची आवक झाली. त्याचा परिणाम बाजारात दर घसरण्यावर झाला. कॅनिंगलाही त्याचा फटका बसला. आंबा प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनाही कर्नाटकी आंबा पाठविण्यात येत असल्याने कॅनिंगचा दर आठ रुपयांनी घसरला आहे.

रत्नागिरी - मे महिन्याच्या सुरवातीला पडलेला पाऊस आणि कडकडीत उन्हामुळे वीस टक्‍के हापूसची आवक झाली. त्याचा परिणाम बाजारात दर घसरण्यावर झाला. कॅनिंगलाही त्याचा फटका बसला. आंबा प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनाही कर्नाटकी आंबा पाठविण्यात येत असल्याने कॅनिंगचा दर आठ रुपयांनी घसरला आहे. सध्या प्रतिदिन एक ते दीड हजार टन आंबा कॅनिंगला पाठविला जात आहे. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. दर मिळाला असता तर अखेरच्या टप्प्यात बागायतदार मालामाल झाले असते.

मार्च, एप्रिल या दोन महिन्यामध्ये यावर्षी वीस टक्‍के आंबा मिळाला. ओखी वादळासह बदलत्या वातावरणामुळे यावर्षी पिकावर परिणाम झाला. यावर्षी हंगाम लांबणार याचे संकेत आधीच मिळाले होते. आवक कमी असल्याने वाशीसह मोठ्या बाजारात डझनाचा दर चढा होता. एप्रिलच्या अखेरीस दर खाली आले. मेच्या पहिल्याच आठवड्यात कॅनिंग सुरू झाले, तरी आंबा कमीच होता. १५ मे नंतर कॅनिंगचा आंबा वाढला. पण प्रतिकिलोचा दर १८ ते २० रुपयांपर्यंतच आहे. हा दर २८ ते ३० रुपयांपर्यंत राहावा असे बागायतदारांचे मत आहे.

दर्जेदार आंबा नसल्याने कॅनिंगवाल्यांकडून दर खाली आणले गेले. उत्पादन कमी असतानाही दर कमी राहिल्याने बागायतदारांच्या पदरी निराशा आली. उत्पादन कमी असल्याने बागायतदारांना हंगामाच्या अखेरीस नफ्याचा टक्‍का वाढविण्याची संधी होती; परंतु कॅनिंगकडून साथ मिळाली नाही. बाजार समितीने दर वाढवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना दर्जेदार आंबा न मिळाल्यामुळे दर कमी करावे लागले आहेत.

शेवटच्या टप्प्यात उत्पादन चांगले मिळाले; मात्र कॅनिंगचे दर घसरले. २५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळाला असता तर फायदा झाला असता.
- प्रसन्न पेठे,
बागायतदार

Web Title: Ratnagiri News Canning rate also hits mango cultivators