चिपळूण, खेडला मुसळधार पावसाचा तडाखा 

चिपळूण, खेडला मुसळधार पावसाचा तडाखा 

रत्नागिरी - सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरपट्ट्यात पावसाने धुमाकूळ घातला. वाशिष्ठी, जगबुडी, नारंगी नद्यांना पूर आल्यामुळे चिपळूण, खेड शहरात पाणी घुसले होते. दापोली, मंडणगड तालुक्‍यातही जोरदार पाऊस झाला. उर्वरित सर्व तालुक्‍यामध्ये विश्रांती घेत घेतच पावसाने हजेरी लावली. अमावास्येच्या उधाणामुळे गुहागर, भाट्ये, मिऱ्या किनाऱ्याला दणका बसला. भाट्ये, तवसाळ, मुरुडमध्ये नेहमीपेक्षा अधिक दूरवर पाणी घूसले. रत्नागिरीत काजळी नदीला पूर आल्याने किनाऱ्यावरील भातशेती पाणी घुसले. 

पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम होता. रत्नागिरी तालुक्‍यात सकाळपर्यंत संततधार सुरु होती. दिवसभर पावसाने विश्रांती घेतली; मात्र काजळी नदी दुथडी भरुन वाहत होती. पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतीत घुसले. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराचे पाणी जुना बाजारपूलावरुन गेले. पेठमापजवळील रस्ताही पाण्याखाली होता. वाशिष्ठीची पाणी पातळी 4.70 मीटर इतकी होती. चिपळूणात सर्वाधिक 138 मिमी पावसाची नोंद झाली. खेडमध्ये दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीची पाणी पातळी दुपारी साडेतीन वाजता 7.50 मीटर इतकी होती. धोक्‍याची पातळी ओलांडल्याने किनाऱ्यावरील भागात इशारा देण्यात आला होता. गुहागर, दापोली, संगमेश्‍वर, राजापूरात पावसाचा जोर सायंकाळपर्यंत सुरुच होता. पावसामुळे खेड-दहिवली रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. भोम-मालदोलीत मोरीसह बाजूपट्‌टी खचली. त्यामुळे वाहतूक एकतर्फी होती. दापोली-शिरसोली पुलावर पुराचे पाणी आल्याने तीन तास वाहतूक ठप्प होती. दापोली-दाभोळ रस्त्यावर झाड पडले. 

वेळणेश्‍वर येथे किनाऱ्यावरील चार माड वाहून गेले. शुंगारतळीत दोन घरांमधील सहा कोंबड्या वाहून गेल्या. नवानगर येथील एका घराचे पत्रे उडून 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत भाट्ये किनाऱ्यावंरील नितिन सुर्वे यांच्या घराच्या अंगणात पाणी घुसले. मिऱ्या, मांडवीत उधाणाच्या लाटांमुळे किनाऱ्यांवरील नागरिक भयभित झाले होते. 

आज सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 64.11 मिमी पाऊस झाला. मंडणगड 83, दापोली 85.30, खेड 18.10, गुहागर 30, चिपळूण 138.20, संगमेश्वर 55.30, रत्नागिरी 27.90, लांजा 67.40, राजापूर 71.80 मिमी पाऊस पडला. 1 जूनपासुन आजपर्यंत 599 मिमीची नोंद झाली आहे. 

दांडे पुलाला तडे; वाहतूकीस बंदी 
रेवस रेड्‌डी (ता. राजापूर) रस्त्यावरील दांडे पुलाच्या अणसुरे बाजूकडील बॉक्‍सेल सिंक झाले आहेत. पुलाच्या दोन भिंतीच्या मधील भागात तडे गेल्याचे आढळून आले आहे. हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. बॉक्‍स रिटर्न आणि अणसुरे बाजूकडील बॉक्‍सेल यांच्यातील अंतर वाढत आहे. पावसाळ्यात वाहतूक सुरु ठेवल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या पुलावरील अवजड वाहतूक थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com