कर्णबधिरांना समजावणार विज्ञानाच्या संकल्पना

कर्णबधिरांना समजावणार विज्ञानाच्या संकल्पना

रत्नागिरी - हवा, पाण्याचा दाब, गुरुत्वाकर्षण, ध्वनिलहरी, चुंबकीय लहरी या  संकल्पनांवर आधारित प्रयोग करण्यात कर्णबधिर विद्यार्थी आनंदून गेले. या वैज्ञानिक तत्त्वाचा व्हिडिओ दाखवून तो प्रयोग स्वतः करण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहत होता.

दिव्यांगांनी सातवीनंतर सामान्य शाळेत प्रवेश घ्यावा, असे शासनाचे धोरण असते. त्याकरिता या विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना स्पष्ट समजण्याकरिता हा उपक्रम राबवला जात आहे.

भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग व राज्य समन्वयक जिज्ञासा ट्रस्ट व जिल्हा समन्वयक आश्रय सेवा संस्थेने येथील के. प. अभ्यंकर कर्णबधिर विद्यालयात कार्यशाळा घेतली. यामध्ये अभ्यंकर कर्णबधिर व दापोलीतील इंदिराबाई बडे कर्णबधिर विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले.

जिज्ञासा ट्रस्टच्या विश्‍वस्त सुमिता दिघे यांनी सांगितले, की जिद्द, ज्ञान आणि साहस या गुणांची आवड निर्माण करणे करणारी जिज्ञासा संस्था आहे. घरच्या घरी घडणाऱ्या लहान मोठ्या कृती प्रयोगाच्या स्वरूपात दाखवून मुलांना विज्ञानातली रंजकता समजावून सांगते. ‘छोटे न्यूटन’ विज्ञान संशोधिका उपक्रम राबवला जातो. विद्यार्थ्यांतील नैसर्गिक जिज्ञासू वृत्तीला व कल्पकतेला वाव देण्याकरिता २५ वर्षे नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. आश्रय संस्थेचे अध्यक्ष अरुण मुळ्ये यांनी सांगितले की, दिव्यांगांनी बनवलेली उपकरणेही राज्य व राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत यशस्वी ठरली आहेत.

ध्वनिफीत आणि दैनंदिन जीवनात उपयोग होणारे विज्ञान छोट्या प्रयोगांतून समजावून सांगण्यात येणार आहे. कार्यशाळेत सुमिता दिघे, डॉ. आसावरी शिंदे, रश्‍मी जोशी, अरुण मुळ्ये, विजय मुळ्ये व मुख्याध्यापिका माधुरी मादुस्कर, अभ्यंकर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांनी आदी उपस्थित होते.

भारतातील पहिला प्रयोग
सुरेंद्र दिघे व सुमिता दिघे यांनी सांगितले, की दिव्यांगांना सर्वसामान्य मुलांसह शैक्षणिक प्रवाहात आणण्याकरिता मूलभूत विज्ञानाच्या १५ संकल्पनांवर १०० व्हिडिओ बनवले. प्रकल्पप्रमुख समीर सहस्रबुद्धे व आयआयटीचे प्राध्यापक डॉ. आशय सहस्रबुद्धे यांनी २०१५ मध्ये हे काम पूर्ण केले. हिंदी, इंग्रजीसह कर्णबधिरांच्या खाणाखुणांच्या भाषेत व्हिडिओ केले आहेत. भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे. याला विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अनुदान मिळाले. अशा कार्यशाळा १०० शाळांमध्ये घेतल्या. आता गणिताचेही असे व्हिडिओ करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com