सीआरझेडमधील बदल शहरांच्या पथ्‍यावर

सीआरझेडमधील बदल शहरांच्या पथ्‍यावर

गुहागर - केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने सागरी नियमन क्षेत्राबाबत (सीआरझेड) नवा अध्यादेश जनहितार्थ प्रसिद्ध केला आहे. या अध्यादेशात सीआरझेडची मर्यादा ५० मीटरने घटविण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवरील मोठी शहरे सोडल्यास या कायद्याचा ग्रामीण विकासासाठी फार मोठा हातभार लागणार नाही, असे संकेत त्यातील तरतुदींवरून मिळत आहेत. 

सीआरझेड कायद्यामध्ये सीआरझेड ३ ए व ३ बी असे बदल नव्याने करण्यात आले आहेत. ज्या गावाची लोकसंख्या १ चौरस किलोमीटरमध्ये २१६१ आहे त्याच गावांमध्ये ५० मीटर क्षेत्र घटविल्याचा फायदा होणार आहे. या अटीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील केवळ रत्नागिरी हे शहर बसते. अन्य गावांची लोकसंख्या विरळ असल्याने १ चौरस किलोमीटरमध्ये २१६१ एवढी लोकसंख्याच नाही. शिवाय सीआरझेड कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भूमिअभिलेखच्या नकाशांप्रमाणे गावांचा व शहरांचा विचार करण्यात आला आहे.

उदाहरणार्थ भूमिअभिलेखागारामध्ये गुहागर नगरपंचायतीचे वरचापाट तर्फे गुहागर, कीर्तनवाडी तर्फे गुहागर आणि गुहागर गाव असे तीन तुकडे नोंदले गेले आहेत. त्याचप्रमाणे १ चौरस किलोमीटर कोठून मोजायचे याची निश्‍चितीही करण्यात आलेली नाही. गुहागरमध्ये कमाल भरती रेषा तयार करताना भविष्यात समुद्राचे पाणी किती आत येईल याचाही विचार करण्यात आला आहे. फयानसारखी नैसर्गिक आपत्ती तसेच अपवादात्मक वेळी उधाणाच्या भरतीचे पाणी समुद्रकिनारी असलेल्या वाड्यांमध्ये शिरले होते. हे लक्षात घेऊन कमाल भरती रेषा ही वाड्यांमध्ये गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे पश्‍चिमेकडील बहुतांशी जुनी घरे ही नव्याने निश्‍चित केलेल्या कमाल भरती रेषेपासून ५० मीटरचे आत येतात. त्यामुळे येथे नवे बांधकाम होऊ शकत नाही. 

केवळ गुहागरच नव्हे तर कोकणातील किनारपट्टीवरील कोणत्याच गावांना सीआरझेडच्या बदललेल्या कायद्याचा उपयोग होणार नाही. असे प्रथमदर्शनी समोर येत आहे. नव्या कायद्याबाबत हरकती घेण्यासाठी ६० दिवसांची मुदत आहे. या कालावधीत सीआरझेडच्या अभ्यासकांनी कोकणातील ग्रामीण भागाच्या या अडचणी केंद्र सरकारसमोर मांडणे आवश्‍यक आहे. 

प्रती चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता (२०११ च्या जनगणेनुसार)

  • वरचापाट तर्फे गुहागर (ता. गुहागर) : ५५३
  • झाडगांव (रत्नागिरी शहर) : २११५
  • पावस (ता. रत्नागिरी) : ३७०
  • भाट्ये (ता. रत्नागिरी) : १०५५
  • मालवण (सिंधुदुर्ग) : २९७४
  • (मालवण, अलिबागसारख्या शहरांना फायदा होणार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com