फुणगूसकर कुटुंबीयांनी साकारला दौलताबाद किल्ला...

महादेव तुरंबेकर
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

गेली २१ वर्षे श्री. फुणगूसकर अविरतपणे वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देतात. हौसेने किल्ले बनविले जातात; पण फुणगूसकरांचे किल्ले वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गड-किल्ल्यांचा हा महाराष्ट्र आहे. या किल्ल्यांचा इतिहास जागृत करण्याचे काम फुणगूसकर कुटुंबीय करीत आहेत. त्यांच्या या तळमळीचे साऱ्यांनी अनुकरण केले पाहिजे.

रत्नागिरी -  ‘‘गेली २१ वर्षे श्री. फुणगूसकर अविरतपणे वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देतात. हौसेने किल्ले बनविले जातात; पण फुणगूसकरांचे किल्ले वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गड-किल्ल्यांचा हा महाराष्ट्र आहे. या किल्ल्यांचा इतिहास जागृत करण्याचे काम फुणगूसकर कुटुंबीय करीत आहेत. त्यांच्या या तळमळीचे साऱ्यांनी अनुकरण केले पाहिजे. आज त्यांच्या किल्ल्याचे उद्‌घाटन करण्याचे भाग्य मला लाभले’’, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा महिला संघटक आणि रत्नागिरी पालिका महिला व  बालकल्याण समिती सभापती सौ. शिल्पा सुर्वे यांनी केले. 

२१ वर्षे श्री. फुणगूसकर हे साळवी स्टॉप-नाचणे रोडवरील माध्यमिक शिक्षक पतपेढीजवळील आपल्या घरी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारतात. रत्नागिरीत दिवाळीचा किल्ला म्हटला की, त्याला जोडून साऱ्यांना आठवण येते ती फुणगूसकरांची. किल्ला साकारण्यापूर्वी त्यांना परिसरातील लोक उत्सुकतेने कोणता किल्ला बनविणार याची विचारपूस करतात. किल्ल्याचे उद्‌घाटन करूनच तो सर्वांसाठी खुला करतात. आजपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते किल्ल्याचे उद्‌घाटन झाले. यंदा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते श्री. फुणगूसकर यांच्या किल्ल्याचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी नाचणेचे प्रतिष्ठित नागरिक आणि माजी सरपंच संदीप सावंत, माजी सदस्य दिलीप ऊर्फ बब्या शिवगण, जेके ज्वेलर्सचे जगन्नाथ खेडेकर, ज्येष्ठ पत्रकार दत्ता महाडिक आदी उपस्थित होते.

श्री. फुणगूसकर यांनी यंदा दौलताबाद किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे. २० फूट लांब, १५ फूट रुंद व १२ फूट उंच असा किल्ला आहे. यंदा केवळ चार ते पाच दिवसांत श्री. फुणगूसकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने  किल्ला साकारला. किल्ल्याला दोन मोठे बुरूज असून, किल्ल्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून गेल्यावर दुसऱ्या बाजूने भुयारी मार्गाने बाहेर पडता येते.

किल्ल्यावर गेल्यावर प्रथम शिवाजी महाराजांचे दर्शन घडते. हा किल्ला साकारण्यासाठी फुणगूसकर यांना कुटुंबीयांसह बाबासाहेब कस्तुरे, प्रदीप कळंबटे, बाळू कोळी, श्रीनाथ कोळी, प्रदीप रजपूत, सोमनाथ सूर्यवंशी यांनी मदत केली. गेल्या दोन दिवसांपासून शेकडो नागरिकांसह किल्लाप्रेमी आणि बच्चेकंपनीने किल्ल्याला भेट दिली. किल्ला सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुला असल्याने पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीच्या मनात राहावा म्हणून, तसेच छत्रपतींच्या पराक्रमापासून प्रेरणा घेऊनच दरवर्षी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न करतो. आजच्या पिढीलाही आपला इतिहास समजावा हाही उद्देश आहे. किल्लाप्रेमींकडून तसेच मान्यवरांकडून दरवर्षी कौतुकाची थाप मिळते. तीच प्रेरणा सदैव नवी उमेद देते.
- बापू फुणगूसकर, सामाजिक कार्यकर्ते