देवरुख नगरपंचायतीत येणार पुन्हा महिलाराज

देवरुख नगरपंचायतीत येणार पुन्हा महिलाराज

देवरूख - देवरूख नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने झालेल्या प्रभाग रचनेनंतर आज सदस्यपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. नवी प्रभाग रचना आणि नव्या आरक्षणामुळे इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. सर्वाधिक फटका पुरुषांना बसला आहे.

नगराध्यक्षपदासह नगरसेवकांची ९ पदे महिलांच्या वाटणीला जाणार असल्याने देवरूखात पुन्हा महिलाराज येणार हे निश्‍चित झाले आहे. खेडचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आविषकुमार सोनवणे व मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता नगरपंचायतीच्या समाजमंदिर सभागृहात आरक्षण सोडतीला सुरवात झाली.

आरक्षणाच्या चिठ्ठया काढण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल देवरूखचे विद्यार्थी विनायक परांजपे आणि पराग कदम यांना पाचारण करण्यात आले. नव्या प्रभाग रचनेत १ प्रभाग अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असल्याने त्याचे आरक्षण पहिल्यांदा काढण्यात आले. यासाठी प्रभाग क्रमांक १३ करिता पुरुष व महिला अशी चिठ्ठी होती. यातून पुरुष आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५ प्रभागांची आरक्षणे काढण्यात आली. यासाठी १६ प्रभागातून महिलांसाठी ३, तर पुरुषांसाठी २ प्रभाग राखीव करण्यात आले.

त्यानंतर शिल्लक ११ प्रभागातून ५० टक्‍के महिला आरक्षणाप्रमाणे महिला राखीव साठी ६ प्रभागांकरिता आरक्षणे काढण्यात आली. महिलांसाठी राखीव झालेले प्रभाग हे प्रतिष्ठेचे आणि नामवंत उमेदवारांसाठी महत्वाचे ठरणारे होते. शेवटच्या टप्प्यात शिल्लक ५ प्रभागांची निवड सर्वसाधारण आरक्षणासाठी करण्यात आली. देवरूखची नवी प्रभाग रचना सोमवारी (ता. ११) प्रसिद्ध होणार असून त्यावर हरकती घेण्यासाठी १८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. २२ डिसेंबरला सुनावणी होऊन ३० डिसेंबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. 

प्रभागांची आरक्षणे

  •  अनुसूचित जाती जमाती पुरुष    प्रभाग १३
  •  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला    प्रभाग क्रमांक २, ८, ९
  •  नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष    प्रभाग क्रमांक ५,१६
  •  महिला राखीव .....प्रभाग क्रमांक ३, ११, १२, १४, १५, १७
  •  सर्वसाधारण (ओपन)........प्रभाग क्रमांक १,४,६,७,१०
  •  नगराध्यक्ष आरक्षण    नामाप्र महिला

नव्या प्रभागरचनेसह उमेदवारीची चर्चा

देवरूख नगरपंचायत प्रभागांचे आरक्षण जाहीर होताच नव्या प्रभाग रचनेनुसार देवरूखात आता उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोणाला कुठून संधी मिळणार आणि कोण कुणा विरोधात लढणार याचीच चर्चा आज दिवसभर ऐकायला मिळत होती.

नगरपंचायतीची पंचवार्षिक मुदत मार्च २०१८ ला संपत आहे. त्यामुळे पुढील वर्षी फेब्रुवारीला देवरूख नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा फड रंगणार आहे. गेल्या पाच वर्षात शहरातील राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने यावेळची निवडणुक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. पहिल्या निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षासाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिला राखीव होते, त्यामुळे यावेळी ते पुरुषांसाठी राखीव होईल अशा अपेक्षेत असणाऱ्यांना सरकारने थेट नगराध्यक्ष निवड जाहीर करून पहिला दणका दिला.

त्यानंतर आरक्षण ओबीसी महिला असे जाहीर झाल्यावर तर गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्यांना दुसरा दणका बसला. आता प्रभाग रचनाच बदलल्याने नव्या गणितांची जुळवाजुळव करावी लागणार असल्याचे इच्छुकांना आणखी एक दणका बसला असतानाच आज पडलेल्या आरक्षणाने अनेकांची दांडी गुल झाली आहे. ५० टक्‍के महिला आरक्षणामुळे १७ पैकी ९ प्रभाग महिलांसाठी राखीव, तर नगराध्यक्षपदही महिलेकडे जाणार असल्याने देवरुखात महिलाराज येणार आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्गच्या ५ पैकी ३ प्रभाग महिला राखीव झाल्यावर खास महिला राखीव ६ प्रभागांच्या आरक्षणाकडे अनेकांचे डोळे लागले होते. आपला प्रभाग त्यात येऊ नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले खरे पण प्रभाग ३, ११, १२, १४, १५ आणि १७ असे प्रतिष्ठेचे भाग महिला राखीव झाल्याने पुरुषांना येथे आणखी एक धक्‍का बसला आहे.

देवरूखची प्रभाग रचना यावेळी प्रथमच गुगल मॅपवरून करण्यात आली. त्यात उत्तरेकडून रचना करीत डावी आणि उजवी बाजू अशा पद्धतीने प्रभाग रचना झाली आहे. प्रभाग रचनेवर हरकती आल्यास त्यावर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना होईपर्यंत देवरूखचे चित्र स्पष्ट होणार नाही. परिणामी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर इच्छुकांना मोर्चेबांधणीसाठी केवळ दीड महिन्याचाच अवधी मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com