कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला वेग

मुझफ्फर खान
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

चिपळूण - कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून रोहा ते आरवलीपर्यंतचे काम ‘एल अँड टी’ या कंपनीला मिळाले आहे. चिपळूण येथे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. चार दिवसांत विद्युतीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू होणार आहे. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.

चिपळूण - कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून रोहा ते आरवलीपर्यंतचे काम ‘एल अँड टी’ या कंपनीला मिळाले आहे. चिपळूण येथे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. चार दिवसांत विद्युतीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू होणार आहे. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून डिझेलवर धावणाऱ्या रेल्वे भविष्यात इतिहासजमा होणार आहेत. 

मुंबई व मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा कोकण रेल्वे प्रमुख मार्ग आहे. १९९८ पासून सुरू झालेली ही रेल्वे ७४० किमी मार्गाचे संचलन करीत आहे. रायगड येथून सुरू होणारा कोकण रेल्वेचा मार्ग कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ ला खुला करण्यात आलेल्या या रेल्वे मार्गावरून आतापर्यंत डिझेलवर चालणाऱ्या रेल्वे गाड्या धावत होत्या. रेल्वे स्थानकांची दुरवस्था, नवीन गाड्यांची गैरसोय, एक्स्प्रेस गाड्यांचे कोलमडलेले वेळापत्रक, नवीन मार्ग निर्माण करण्याकडे दुर्लक्ष करणे अशा अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. १८ वर्षांच्या या कालखंडात अनेक रेल्वेमंत्री बदलेले; मात्र कोकण रेल्वेचे चित्र ‘जैसे थे’ आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वे स्मार्ट आणि जलद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रभूंकडे रेल्वे खाते नसले तरी त्यांनी मंत्रिपदाच्या काळात कोकणवर कृपा दाखविल्यामुळे तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पांना चालना मिळाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेसह येथील नागरिकांनाही अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी प्रथमच ८०६ कोटींच्या रेल्वे बजेटमध्ये मोठी आर्थिक वाढ देत ४ हजार कोटी एवढ्या आर्थिक तरतुदीला मान्यता दिली.

या वाढीव बजेटमधून रखडलेल्या ५ महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामध्ये रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण २५० कोटी, विद्युतीकरण ९०० कोटी, चिपळूण-कराड कनेक्‍टिव्हिटी ८०६ कोटी, ११ नवीन स्थानके तयार करणे ५०० कोटी यांसह पुढील २ वर्षांतील कामांसाठी ४ हजार कोटी तर ५ वर्षांतील कामांसाठी १० हजार कोटी उभे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कराड-चिपळूण मार्गाची कनेक्‍टिव्हिटी तयार करण्याचे सेंटर रेल्वे करणार आहे. ११ स्थानकांचे विस्तारीकरण, रेल्वे गाड्या धावण्याची क्षमता दुपटीने वाढविण्याचे कामही घेण्यात आले आहे. संपूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. 

कंपनीचा डेरा चिपळुणात 
चिपळूण हे सोयीचे ठिकाण असल्यामुळे रोहा ते आरवलीपर्यंत विद्युतीकरणाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीचे कार्यालय चिपळुणातील कळंबस्ते येथे सुरू करण्यात आले आहे.

रोहा ते आरवलीपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम तातडीने सुरू व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील चार दिवसांत कामाला सुरुवात होणार आहे.
- बाळासाहेब निकम
विभागीय व्यवस्थापक कोकण रेल्वे