साडवलीत नौदलाच्या पराक्रमाची साक्ष देणारे थरारक प्रदर्शन 

साडवली ः गाझी हटस्‌च्या आठवणी जपणारा पाणबुडीचा दरवाजा बने इंटरनॅशलन स्कूलमधील प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरला. 
साडवली ः गाझी हटस्‌च्या आठवणी जपणारा पाणबुडीचा दरवाजा बने इंटरनॅशलन स्कूलमधील प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरला. 

साडवली - भारतीय युध्दनौकांनी विशाखापट्‌टणम येथे केलेल्या एका बॉम्ब हल्ल्यात शत्रुची "गाझी' पाणबुडी बेचिराख झाली. समुद्राच्या पृष्ठभागावर आलेल्या साहित्यामध्ये पाणबुडीचा दरवाजा सापडला. त्याची जपणूक नौदलाच्या सामुद्रिक इतिहास संस्थेने केली आहे. हा दरवाजा साडवली येथील नौदलाच्या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले.

(व्हिडिआे - राजेश कळंबटे)

त्याचबरोबर 1971 च्या युध्दात "आयएनएस खुकरी' युध्दनौकेचे कॅप्टन सिंग यांनी दिलेल्या प्राणाहुतीचा इतिहास ऐकताना सारेच थरारुन गेले. नौदलाचा असा अमूल्य ठेवा पाहण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. 

देवरुख येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतातील पहिले "हिस्टोरिया 2017' प्रदर्शन सुरु झाले. सामुद्रिक इतिहास संस्थेशी निगडीत असलेले कसबा येथील सचिन सावंत नौदलाच्या कामगिरीची माहिती देतात. नौदलातील युद्ध सामुग्री प्रदर्शनात 1961, 1971 अशा अनेक युद्धप्रसंगी वापरलेली शस्त्रे येथे पाहायला मिळत आहेत. भारतीय नौदलाची स्थापना 1934 साली झाली. नेव्हीचे बोधचिन्ह, विविध ध्वज, धडाडीच्या सेनापतींचा इतिहास, वापरण्यात आलेली क्षेपणास्त्रे, युद्ध नौकांचा इतिहास, आयएनएस विराट, डेलीक्‍लास, त्रिशूळ, पाणबुड्यांचा इतिहास या प्रदर्शनातून उलगडला गेला. दिवसभरात या प्रदर्शनाला सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. 

भारत आणि पाकिस्तान युध्दाच्या अनेक आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला. "गाझी हटस्‌' या नावाने पाणबुडीचा दरवाजा नौदलाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा अमूल्य ठेवा ठरत आहे. 3 डिसेंबर 1971 मध्ये विशाखापट्‌टणमजवळ राजपुत आणि अक्षय या दोन भारतीय नौका गस्त घालत होत्या. खोल समुद्रातून कोणतीतरी वस्तू सोनारवर दिसली. शत्रुचा धोका ओळखून गस्तीच्या नौकांनी त्यावर बॉम्बगोळे फायर केले.

काही कालावधीनंतर बॉम्ब टाकलेल्या ठिकाणी त्या दोन नौका पोहचल्या. तेथे समुद्राच्या पृष्ठभागावर अनेक वस्तू होत्या. त्यातील "गाझी' पाणबुडीचा एक दरवाजा हाती लागला. तोच हल्ल्याच्या आठवणीची साक्ष ठरला. ती पाणबुडी पाकिस्तानची असावी असा अंदाज बांधला गेला. पण त्याला ठोस पुरावे न मिळाल्याने त्या विषयावर पडदा पडला. मात्र तो दरवाजा आजही उत्सूकतेचा विषय आहे. 

युध्दामध्ये किंवा दुर्घटनेत नौका बुडणार असेल तर, त्यावरील शेवटची व्यक्‍ती बाहेर पडेपर्यंत कॅप्टनने नौका सोडायची नसते. 1971 च्या युध्दात "आयएनएस खुकरी' चे कॅप्टन सिंग यांनी नेमके असेच केले. शत्रुच्या बॉम्बहल्ल्यात आयएनएस नष्ट होण्याच्या मार्गावर होती. नौकेवरील सैनिकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु होता. त्यावेळी कॅप्टन एस. एन. सिंग यांनी नौका सोडून जाण्यास नकार दिला. नादुरुस्त झालेल्या नौकेला जलसमाधी मिळाली. कॅ. सिंग यांनी निडरपणे प्राण दिले. अशा अनेक आठवणी वस्तुरुपात नौदलाचा इतिहास जागा करत आहे. 

नौदलाचा इतिहास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनुभवयाला मिळावा आणि त्यातून नौसैनिक तयार व्हावेत या हेतूने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याला नौदल आणि सामुद्रिक इतिहास संस्थेचे सहकार्य मिळाले. 
सुभाष बने, संस्थापक अध्यक्ष 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com