आखाती देशांपाठोपाठ युरोपमध्येही हापूसची निर्यात सुरु

आखाती देशांपाठोपाठ युरोपमध्येही हापूसची निर्यात सुरु

रत्नागिरी - आखाती देशांपाठोपाठ युरोपमध्ये निर्यात सुरु झाली आहे; परंतु सध्या इग्लंडमध्ये पाऊस आणि थंडी असल्याने रत्नागिरी हापूसला मागणी कमी आहे. तरीही तेथील चलनानुसार डझनला 9 ते 12.5 पौंड (भारतीय चलनानुसार 900 ते 1100 रुपये) दर मिळत असल्याचे तेथील व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. हाच दर आवक वाढल्यानंतर उतरण्याची शक्यता असली तरीही दर्जदार आंबा मिळत असल्याचे समाधानही व्यक्त केले.

चव, गोडी यामुळे रत्नागिरी हापूसला परदेशामध्ये मोठी मागणी आहे. यावर्षी उत्पादन कमी असले तरीही निर्यात लवकर सुरु झाली आहे. आखाती देशांपाठोपाठ युरोपमध्ये प्रारंभ झाला आहे. प्रतिदिन काही टन आंबा रवाना होत आहे. वाशीतील केंद्रातून उष्णजल प्रक्रियेद्वारे आंबा पाठविला जात आहे. 28 मार्चला पहिली कन्साईनमेंट इग्लंडला रवाना झाली.

उन्हाळा सुरु झाला की हापूस खाण्यासाठी वापरतात असे अनेकांना वाटते. त्यामुळे ग्राहकांकडूनच उठाव कमी होत आहे. ही परिस्थिती आठवडाभरात बदललेल अशी आशा आहे.

- तेजस भोसले, व्यापारी, इंग्लड

इग्लंडमधील व्यापारी तेजस भोसले यांना भारतातून सव्वासात हजार किलो हापूस विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. तीन ते चार दिवसांनी येथील बागायतदार किंवा वाशीतील विक्रेत्यांकडून श्री. भोसले आंबा मागवून घेतात. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मागणी कमी आहे. वातावरणामुळे हापूस संकटात सापडला आहे. चाळीस टक्केच उत्पादन असल्याने देशी बाजारातच दर अधिक मिळत आहे. त्यामुळे निर्यातीला आंबा कमी मिळत आहे. रत्नागिरी हापूसबरोबर कर्नाटकी, देवगड यासह विविध प्रकारचे आंबे इग्लंडला निर्यात केले जातात.

रत्नागिरी हापूसला इग्लंडमध्ये 9 पौंडापासून ते 12.5 पौंडापर्यंत दर मिळत आहे. दर्जेदार आंब्याला चांगला दर मिळतो; परंतु तेथील वातावरण खराब असल्याने ग्राहकांकडून मालाचा उठाव होत नाही. तशीच काहीशी परिस्थिती भारतामध्ये हापूसची झाली आहे. हिरवा किंवा कच्चा आंबा घरी घेऊन गेल्यावर तो सडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याचा दरावर आणि विक्रीवर परिणाम होतो.

निर्यातीमधील मालातही असे खराब आंबे सापडत असल्याचे वाशीतील व्यापार्‍यांचे मत आहे; परंतु इग्लंडमधील काही व्यापार्‍यांनी रत्नागिरी हापूसच्या चांगल्या कन्साईनमेंट मिळाल्याचे सांगितले आहे. आंबा कोणाकडून निर्यात होत आहे, यावर त्याचा दर्जा ठरत आहे. निर्यात करतानाही व्यापार्‍यांची जबाबदारी वाढली आहे.

आखातातील चार देशांनी दुबईतून निर्यातीवर बंदी

हापूस आंब्याची आंतरराष्ट्रीय राजधानी म्हणून दूबईची ओळख आहे. दुबईतून हापूस आंब्याची आयात करण्यास ओमान, कतार, दोहा आणि मस्कत या आखाती देशांनी नकार दिला आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत आहे. कोकणातील 30 टक्के आंबा आखातात जातो. त्या चार देशांनी थेट आंबा पाठविला तर तो खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. यापुर्वी आंबा पाठविणार्‍या पाच दलालांना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत. दुबई सरकारने पाच टक्के व्हॅट लागु केल्याने हा प्रकार झाल्याचे कारण पुढे येत आहे. याला वाशी बाजार समितीमधील व्यापार्‍यांकडून दुजोरा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com