मासा श्रीवर्धनकडे; मरतुकीत ५० टक्‍के घट

राजेश कळंबटे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

एका किनाऱ्यावर मासेमारी सुरू झाली की मासा पुढे-पुढे पळत जातो. मच्छीमारही त्या पाठोपाठ जातात. सध्या रत्नागिरीच्या किनाऱ्यावरील मासळी हर्णै पार करून पुढे श्रीवर्धनच्या दिशेने गेली आहे.
- तन्वीर भाटकर, मच्छीमार

रत्नागिरी -  कोकण किनारपट्टीवर गेल्या पंधरा दिवसांत विक्रमी बांगडी मिळाली होती; मात्र मासेमारी वेगाने सुरू झाल्यानंतर मासा श्रीवर्धनकडे सरकला आहे. तुलनेत मच्छी मिळण्याचे प्रमाण पन्नास टक्‍केनी घटले आहे. केंडच्या उपद्रवामुळे जाळ्याचे नुकसान टाळण्यासाठी थेट मासेमारीला जाणे मच्छीमार टाळत आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग ते अलिबाग या भागात जेलीफिशचेही आगमन झाल्याने मच्छीमारांची डोकेदुखी वाढली आहे. त्याचा फटका मासेमारीला बसत आहे.

मच्छी पुढे सरकू लागल्याने मच्छीमारांना मुंबईपर्यंत मासेमारीसाठी जावे लागते. दहा ते बारा तासांचा प्रवास करत मच्छीमार तिकडे जात असले, तरीही बर्फाचा तुटवडा मच्छीमारांच्या मेहनतीवर पाणी फेरत आहे. पंधरा दिवसांपूर्वी बंपर बांगडी मासा सापडत होता. तो जोर ओसरला असून सध्या ५० ते ७० डिश मासा प्रत्येक नौकेला मिळत आहे.

पन्नास टक्‍के घट झाली असली तरीही दर्जानुसार एका डिशचा दर ८०० ते १५०० रुपये मिळतो. हा दर कमी आहे. बर्फ नसल्याने बांगडी मासा फिशमिलसाठी पाठविण्याची वेळ प्रथमच मच्छीमारांवर आली. श्रीवर्धनहून मच्छी पकडून येण्यासाठी वेळ लागत असल्याने सुरवातीला मिळणाऱ्या माशाचा दर्जा राहत नाही. तो खराब होतो. त्याचा दरावर परिणाम झाला आहे. मागील तीन वर्षांत केंड माशाचा प्रादुर्भाव वाढत आहे. 

डिसेंबरपर्यंत हा मासा कोकण किनारपट्टीवर आढळत आहे. या माशांच्या झुंडीमुळे अनेक मच्छीमारांची जाळी फाटली आहेत. हा मासा सापडल्यानंतर काही मिनी पर्ससीननेटधारकांनी समुद्रात जाणे टाळले आहे. हा मासा १० वावात आढळून येतो. पर्ससीननेट मच्छीमारांनाही त्याचा त्रास जाणवतो. तरीही नाईलाजास्तवर धोका पत्करुन या नौका समुद्रात जात आहेत. जेलीफिश जाळ्याच्या बोयावर बसतो, त्यामुळे जाळ्यात सापडलेल्या मासळीला बाहेर पडण्यास मोकळी जागा मिळते. अनेक मच्छीमार यामुळेही त्रासाले आहेत. हवामानातील बदल, पाण्याला असलेला करंट यासह केंड, जेलीफिशच्या झुंडीचे आव्हान मच्छीमारांपुढे आहे.

पावसाने किनारे गढूळ
शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत चिपळूण, संगमेश्‍वर, लांजा व राजापूर तालुक्‍यांत जोरदार पाऊस झाला. परिणामी रत्नागिरीतील किनारे पूर्णतः गढूळ झाले आहेत. ५ ते ६ वाव आतपर्यंत गढूळ पाणी दिसून येते. पावसामुळे धरणातील पाणी नदीपात्रात सोडले जाते. ते पाणी समुद्राला मिळते आणि किनारे गढूळ होतात. भाट्येसह पूर्णगड किनाऱ्यापर्यंत असा गढूळ पाण्याचा भाग आढळून आला आहे, असे मच्छीमारांनी सांगितले.