वादळी वाऱ्यांनी मच्छीमार हतबल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

हर्णै - वादळाच्या धक्‍क्‍यानंतर मासेमारीला सुरवात होते न होते तोच पुन्हा वादळी वाऱ्यांनी तोंड वर काढल्याने मच्छीमार हतबल झाला आहे. नौकांसकट खलाशांची व मच्छीमारांची फरफट उडाली आहे. काय करायचं आता, कसा धंदा करायचा, कशी दिवाळी साजरी करायची असा प्रश्न मच्छीमारांपुढे पडला आहे. बंदरात मासळीच येत नसल्यामुळे खवय्येदेखील नाराज झाले आहेत.

हर्णै - वादळाच्या धक्‍क्‍यानंतर मासेमारीला सुरवात होते न होते तोच पुन्हा वादळी वाऱ्यांनी तोंड वर काढल्याने मच्छीमार हतबल झाला आहे. नौकांसकट खलाशांची व मच्छीमारांची फरफट उडाली आहे. काय करायचं आता, कसा धंदा करायचा, कशी दिवाळी साजरी करायची असा प्रश्न मच्छीमारांपुढे पडला आहे. बंदरात मासळीच येत नसल्यामुळे खवय्येदेखील नाराज झाले आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटक येणार आणि बंदरात मासळी नाही म्हटल्यावर नाराज होऊन परत माघारी जाणार हा मोठा आर्थिक फटका या बंदरात मासे विक्रीला बसणाऱ्या महिला मच्छीमारांपुढे आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे हर्णै बंदराचे अर्थकारण ढासळून गेले. दापोली तालुक्‍याच्या बाजारपेठेची आर्थिक नाडी असलेल्या हर्णै बंदर दिवसेंदिवस कोलमडत चालले आहे.

वातावरणातील बदल आणि मासळीची कमी होणारी आवक ही त्याची प्रमुख कारणे आहेत. गणपतीअगोदर मासळी हंगाम बरा गेला. पण सणानंतर मात्र वादळाने तोंड फोडले. मच्छीमारांनी सर्व तयारी करून मासेमारीला सुरवात केली तोच अरबी समुद्रात मोठे वादळ तयार झाले. आजवर कधीही न घडलेली दुर्घटना बंदरात घडली. ५ नौकांना जलसमाधी मिळाली. त्या दिवसांमध्ये वादळ शांत होईपर्यंत मच्छीमार मासेमारीकरिता गेलेच नव्हते. 

२९ सप्टेंबरनंतर मासेमारीला सुरवात होते न होते तोच पुन्हा ५ ऑक्‍टोबरपासून वादळी वारे सुरू झाले. शासनाने पुन्हा मच्छीमारांना १४ ऑक्‍टोबरपर्यंत हाय अलर्ट दिल्याने पुन्हा मच्छीमारांची तारांबळ उडाली. सकाळी वातावरण चांगले तर पुन्हा दुपारनंतर वादळी वारे सुटू लागले. यामुळे मासेमारीकरिता बाहेर गेलेल्या मच्छीमारांनी देवगड, मुरुड जंजिरा, जयगड आदी ठिकाणच्या सुरक्षित खाडीकिनाऱ्यांचा आधार घेतला.

ज्या खाडीचा आसरा तेथेच लिलाव
वातावरणाच्या खेळखंडोब्यामुळे सकाळच्या चांगल्या वातावरणात मासेमारी करायची आणि दुपारनंतर वादळी वातावरण असेल तर कुठल्यातरी खाडीत आसरा घ्यायचा, असे गेले ८ ते १० दिवस सुरू आहे. यामुळे कमी वेळात जेवढी मासळी मारली जाते तेवढ्याच मासळीचा ज्या बंदरात बोटी थांबतात तेथेच लिलाव करून भत्ता, डिझेल आदींचा खर्च भागवला जातो, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.