लाटेगणिक पत्नी, मुले डोळ्यासमोर दिसत - शिवचंद्र राजभर

लाटेगणिक पत्नी, मुले डोळ्यासमोर दिसत - शिवचंद्र राजभर

हर्णै - ‘‘ज्यावेळेस समुद्रात उडी मारली तेव्हा जगण्याची आशाच सोडली होती; पण माझ्याकडे बोया होता आणि पोहायला लागल्यावर हिंमत सोडली नाही. गावाकडची माझी पत्नी आणि तीन मुले सारखी डोळ्यासमोर दिसत होती. माझ्यावर परमेश्वराची कृपा होती म्हणून आज मला ‘जीवन’दान मिळाले’’, वादळात बेपत्ता झालेला परंतु किनारी पोहत येऊन वाचलेला खलाशी शिवचंद्र राजभर त्याच्या जिद्दीची कहाणी सांगत होता. 

वादळी दर्याशी दोन हात करीत साडेसात तास झुंज देत त्याने किनारा गाठताना काय केले हे त्याच्या गावीही नव्हते. आपण परमेश्‍वरामुळे वाचलो, असेच तो सांगत होता. हर्णै बंदरात वादळामुळे पाच नौकांना जलसमाधी मिळाल्याच्या दुर्घटनेतील सुदैवी ठरलेल्या खलाशी शिवचंद्र राजभर याची ही चित्तथरारक कहाणी.रामचंद्र पाटील यांच्या नौकेवर तो खलाशी आहे. नौका बुडाल्यावर शिवचंद्र राजभर हा बोयाच्या साह्याने काल सायंकाळी सालदुरे किनाऱ्यावर पोहोचला. सागराशी झुंज देत आल्यानंतर प्रचंड थकवा आल्याने किनाऱ्यावर एका झाडाखाली त्याला झोप लागली. दरम्यान, तो बेपत्ता असल्याचे उघड झाल्याने पोलिस आणि ग्रामस्थ रात्रभर त्याला संपूर्ण सालदुरे किनाऱ्यावर शोधत होते. मला दुसरे आयुष्य मिळाले, असे शिवचंद्र याने दै ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

तो म्हणाला की, समुद्रात जोरदार तुफान झाले. आम्ही आमची नौका वादळाच्या तडाख्यातून बचावासाठी आंजर्ले खाडीत नेत होतो, पण निसर्गापुढे आमचं काहीच चालत नव्हते. आमच्या बोटीवर स्वतः आमचे मालक पण होते. अचानक बोटीचे इंजिन बंद पडले आणि लाटांचे तडाखे जोरदार बसू लागले आणि एक जोरदार लाट आल्यावर पाणी बोटीत शिरले. मालकांसह आम्ही सर्व खलाशी हातात जे मिळेल ते घेऊन पाण्यात उड्या टाकल्या. मी स्वतः बोया हातात घेऊन उडी मारली आणि पोहायला लागलो; पण कुठे जातोय हे माझे मलाच कळत नव्हते. कारण एकामागोमाग येणाऱ्या लाटा इकडून तिकडे फेकत होत्या. मोठमोठ्या लाटा आल्या की आपले काही खरे नाही, असे मनात येत होते. तरी देवाचे नाव घेऊन मी लाटांशी झुंजत होतो. जिवाच्या आकांताने पोहत होतो. किती काळ गेला मला कळले नाही. दिशा कळलीच नव्हती. मला थोडा उजेड दिसला. किनाऱ्याचे दर्शन झाले. आणि दुसरा जन्म झाल्यासारखे वाटले. किनाऱ्याकडे जाऊ लागलो, पण तेथे लोकांनी मला बघितले आणि ओरडून सांगितले की या बाजूने वर येऊ नको, इकडे पाण्याला करंट आहे. पुन्हा पाण्यात जाशील म्हणून मी थोडा पुढे पोहत जाऊन किनाऱ्याला पुळणीवर चालत चालत एका झाडाखाली जाऊन बसलो. जिवंत आहे याच भावनेत तेथेच झोप लागली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com