पर्ससीननेटला बंपर बांगडी; फिशिंगला म्हाकूळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - समाधानकारक वातावरणामुळे मच्छीमारांना सुगीचे दिवस आले आहेत. पर्ससीननेटला बंपर बांगडी, तर फिशिंगला म्हाकूळचा उतारा मिळत आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी परवाना नसलेले मिनी पर्ससीननेटच्या मासेमारीला उधाण आले आहे. शिवडसारख्या मासळीसाठी मिनी पर्ससीननेटवाले समुद्रात झेपावत आहेत.

तटरक्षक दलाने दोन दिवसांपूर्वी दहा विनापरवाना मच्छीमारी नौकांवर कारवाई करून मिनीवाल्यांना दणका दिला; मात्र मत्स्यमंत्री महादेव जानकर यांनी दिलेले विनापरवाना मासेमारीवर मत्स्य विभाग नियंत्रण ठेवणार असल्याचे आश्‍वासन हवेत विरले आहे.

रत्नागिरी - समाधानकारक वातावरणामुळे मच्छीमारांना सुगीचे दिवस आले आहेत. पर्ससीननेटला बंपर बांगडी, तर फिशिंगला म्हाकूळचा उतारा मिळत आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी परवाना नसलेले मिनी पर्ससीननेटच्या मासेमारीला उधाण आले आहे. शिवडसारख्या मासळीसाठी मिनी पर्ससीननेटवाले समुद्रात झेपावत आहेत.

तटरक्षक दलाने दोन दिवसांपूर्वी दहा विनापरवाना मच्छीमारी नौकांवर कारवाई करून मिनीवाल्यांना दणका दिला; मात्र मत्स्यमंत्री महादेव जानकर यांनी दिलेले विनापरवाना मासेमारीवर मत्स्य विभाग नियंत्रण ठेवणार असल्याचे आश्‍वासन हवेत विरले आहे.

आठ दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. त्याचा फटका मच्छीमारीला बसला होता. वादळ गेल्यानंतर मच्छीमारांना सुखद धक्‍का बसला. पर्ससीननेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना साडेबारा वावाच्या बाहेर बंपर बांगडी मासा मिळत आहे. प्रत्येक नौकेला दोन ते तीन टन मच्छी मिळत आहे.

३२ किलोच्या एका डिशला (टप) पाचशे ते एक हजार रुपये दर मिळत आहे. एका फेरीला लाखाची मासळी मिळत आहे. म्हाकूळसाठी फिशिंगवाले सायंकाळी लाईटवर मासेमारी करीत आहेत. मांडवी किनाऱ्यापासून काही अंतरावर मागील आठ दिवसांमध्ये शेकडो नौका गळ टाकून मासेमारी करतात. म्हाकूळसाठी डिशला तीन ते चार हजार रुपये दर मिळत आहे. बहुतांश नौकांना एक टनापर्यंत मच्छी मिळत आहे. म्हाकूळ मिळत असल्याने अनेक मच्छीमारांचे चिंगळांकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या चिंगुळचा दर किलोला ३०० ते ३५० रुपयांपर्यंत आहे. पापलेट चारशे ते साडेचारशे रुपये किलो असून छोट्या सुरमईचा दर किलोला अडीचशे ते तीनशे रुपये आहे.

तटरक्षकची कारवाई; मत्स्यचा कानाडोळा 
पर्ससीननेटवाले तसेच मिनी पर्ससीनवाले आणि छोटे मच्छीमार यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. त्यातच मत्स्य विभागाकडून कारवाईची अपेक्षा असताना छोट्या मच्छीमारांचा भ्रमनिरास होत आहे. सध्या मिळणाऱ्या बंपर मासळीचा मिनी पर्ससीननेटधारक फायदा उठवत आहेत. अनेक नौकांना मासेमारीचा परवाना नाही तर काही नौकांकडे कागदपत्रेच नाहीत. तरीही बिनधास्त वावरणाऱ्या या मच्छीमारांकडे मत्स्य विभागाने कानाडोळा केला आहे; मात्र तटरक्षक दलाने कारवाई केली. 

तटरक्षक दलाच्या ‘सी ४०२’ या नौकेने दहा जणांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यात जयगड बंदरातील जय बरफानी, जयगडचा राजा, मातोश्री अष्टविनायक, पांडुरंग गणे, नाटेश्‍वर, हाजी दाऊद-२, नावेद- २, लक्ष्मी गणेश व बिस्बील्ला या बोटींचा समावेश आहे. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तटरक्षक दलाने सुरक्षेसाठी कडक पावले उचलल्याने विनापरवाना किंवा कागदपत्रे नसलेल्या मच्छीमारांना दणका बसला. मिनीवाल्यांविरोधात छोट्या मच्छीमारांनी तक्रारीचा सूर लावला आहे. एका नौकेला किमान एक ते दीड टन शिवड, बांगडी मासा मिळतो. शिवड माशाच्या एका डिशला १५०० ते २००० रुपये दर मिळतो. ५० ते १०० मिनी पर्ससीननेट नौका बिनधास्तपणे मासेमारी करीत असताना मत्स्य विभाग करते काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

बर्फाचा तुटवडा 
सलग मासळी मिळत असल्याने नौका जास्त काळ मिरकरवाडा बंदरात नांगर टाकून थांबत नाहीत. मच्छी उतरवण्याचे काम झाले की लगेचच समुद्रात जाण्यासाठी सज्ज होतात. मच्छी साठवण्यासाठी लागणारा बर्फ पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शेकडो नौका एकावेळी समुद्रात जात असल्याने बर्फाचा तुटवडा जाणवत असल्याचे मच्छीमार पुष्कर भुते यांच्याकडून सांगण्यात आले.