संकष्टीला गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या दोघांना जीवरक्षकांनी वाचवले

प्रमोद हर्डीकर
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

दोघे युवक विजापुरचे,प्रतिबंधक फलक लावूनही दुर्लक्ष

साडवली (रत्नागिरी) : संकष्टीसाठी भाविकांनी गणपतीपुळे येथे गर्दी केली आहे.सकाळी समुद्रस्नान करण्याच्या उद्देशाने विजापुरचे दोन युवक प्रतिबंध क्षेत्रातच अंघोळीसाठी उतरले व ओहोटी असल्याने चाळीत अडकले.आरडाओरडा केल्यावर जय गणेश जिवरक्षकांनी त्या दोघांना सुखरुप बाहेर काढले.

गणपतीपुळे येथे संकष्टीसाठी आलेले विजापुरचे दोन युवक शिवकुमार सिताराम बाडगडी (२०) व सचिन चन्नप्पा कोष्टी (२१) हे दोघे प्रतिबंधक क्षेञातच अंघोळीसाठी समुद्रात गेले.ओहोटीचा काळ सुरु असताना रविवारी सकाळी ८.३० वाजता ते लाटांमूळे निर्माण झालेल्या चाळीत अडकले.ओहोटी असल्याने ते समुद्रात आत खेचले जावू लागले व वाचवा वाचवा असे ओरडू लागले.
दोघे बुडत असल्याचे सानिकावाॅटर स्पोर्टच्या डोर्लेकर बंधुच्या लक्षात आले तसेच ही बाब जय गणेश जीवरक्षक राज देवरुखकर यांच्याही लक्षात आल्याने जेटस्कीच्या वाहकासह बुडणार्‍या युवकांकडे कूच केले. प्रमोद डोर्लेकर, राज देवरुखकर यांनी जेटस्की च्या साहाय्याने या दोन युवकांना चाळीतून सुखरुप बाहेर काढून किनार्‍यावर आणले.
आजपर्यंत डोर्लेकरांनी जेटस्की ने १० जणांचे प्राण वाचवले आहेत.विजापुरच्या या दोघांची पोलीसांनी नोंद घेतली असून विजापूरला घरच्यांशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची कल्पना देण्यात आली आहे.

गणपतीपुळे समुद्रकिनारी ग्रामपंचायत व जीवरक्षकांनी प्रतिबंधक फलक उभारुन पोहण्यास जावू नये म्हणून काळजी घेतली असली तरी भाविक,पर्यटक या गोष्टींकडे कानाडोळा करतात व आपला जीव धोक्यात घालतात.प्रमोद डोर्लेकर व राज देवरुखकर यांचे अभिनंदन होत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 

Web Title: ratnagiri news ganpatipule beach two drowning saved