बिनविरोध निवडणुकीची परंपरा वहाळमध्ये कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

चिपळूण -  तालुक्‍यातील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे. थेट सरपंच निवडीमुळे अनेक गावांत कमालीची चुरस निर्माण झाली आहे; मात्र तालुक्‍यातील वहाळ ग्रामपंचायतीने निवडणुकीत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

चिपळूण -  तालुक्‍यातील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे. थेट सरपंच निवडीमुळे अनेक गावांत कमालीची चुरस निर्माण झाली आहे; मात्र तालुक्‍यातील वहाळ ग्रामपंचायतीने निवडणुकीत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यावेळी थेट सरपंचांसह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले व ही परंपरा जपण्यात आली. 

अनेक गावांतील ग्रामपंचायतीची निवडणूकदेखील प्रतिष्ठेची बनली आहे; मात्र वहाळमधील ग्रामस्थांनी विशेषत: गावातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा आदर्श कायम ठेवला आहे. 

दरवेळी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी ग्रामस्थांनी बैठक गावात घेतात. स्थापनेपासून ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. निवडणुकीतून घराघरांत अंतर्गत वाद निर्माण होतात. पैशाचादेखील मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. निवडणुकीतील वादविवाद वर्षानुवर्षे राहतात. परिणामी ग्रामस्थांमध्ये सलोखा राहत नाही. यासाठी गावाने पूर्वीपासून बिनविरोधची परंपरा कायम राखली आहे. ती यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय झाला.

त्यानुसार जनतेतील थेट सरपंच, उपसरपंच व सदस्यांचाही नावे निश्‍चित करण्यात आली. ग्रामस्थांनी निवड केलेल्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ग्रामपंचायतीसह गावातील सहकार क्षेत्रातही बिनविरोधची परंपरा कायम राहिली आहे. 

गावातील व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती गाव बैठकीच्या विरोधात जात नाही. बैठकीतील निर्णय सर्वजण मान्य करतात. ग्रामस्थांच्या संमतीने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने विकासकामांना चालना मिळण्यास मदत होते.
- सुरेश खापले, माजी सभापती, वहाळ

बिनविरोध निवड होणारे सदस्य
सरपंचपदासाठी श्‍वेता सुरेश लाहीम, उपसरपंचपदासाठी सखाराम धोंडू भुवड, सदस्यपदासाठी सुचिता सुनील मोरे, सचिन सुरेश घोरपडे, सुनील विश्‍वास कुंभार, सौ. प्रीतम पाडुरंग धामणे, सौ. जान्हवी अविनाश घडशी, सौ. शुभांगी पांडुरंग सावर्डेकर, सुजित प्रकाश वहाळकर हे बिनविरोध निवडून येणार आहेत.